यशया 43:1-13
तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्नकर्ता, आणि हे इस्राएला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर, असे म्हणतो, “भिऊ नको; कारण मी तुला सोडवले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे; तू माझा आहेस. तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; मी तुझ्यासाठी मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जिवाबद्दल राष्ट्रे मी देईन. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी तुझा वंश उगवतीकडून आणीन; मावळतीकडून तुला मी एकत्र करीन. मी उत्तरेला म्हणेन, ‘देऊन टाक’; दक्षिणेला म्हणेन, ‘अटकाव करू नकोस’; माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या; ज्यांना माझे नाम ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडले त्या सर्वांना घेऊन या.” डोळे असून आंधळे, कान असून बहिरे अशा लोकांना घेऊन या! सर्व राष्ट्रे एकत्र जमोत, लोक एकवटोत; अशा गोष्टी त्यांतला कोण सांगेल? पूर्वी घडलेल्या गोष्टी त्यांनी आम्हांला ऐकवाव्यात; त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावेत; त्यांनी ते ऐकून म्हणावे की हे खरे आहे. परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “तुम्ही मला ओळखावे, माझ्यावर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हांला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात, तू माझा निवडलेला सेवक आहेस. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. मीच तारण विदित केले, प्राप्त करून दिले व समजावले; तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता; म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे” असे परमेश्वर म्हणतो. “येथून पुढेही मीच तो आहे; माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही; मी करतो ते कोणाच्याने पालटवणार?”
यशया 43:1-13