इब्री 12:1-9
तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे; आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा. तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. आणि तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? “माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस; कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो.” शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवतो, आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षेवाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासीपुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू; तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय?
इब्री 12:1-9