गलतीकरांस पत्र 6:1-10
बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे. एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसर्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणार्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.
गलतीकरांस पत्र 6:1-10