गलतीकरांस पत्र 1:10-17
मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. कारण बंधूंनो, मी तुम्हांला हे कळवतो की, मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही. कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही, आणि ती मला कोणी शिकवलीही नाही; तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. यहूदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे व तिचा नाश करत असे; आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायांविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी; तेव्हा मानवांची2 मसलत न घेता, आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता, मी लगेच अरबस्तानात निघून गेलो; व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो.
गलतीकरांस पत्र 1:10-17