इफिसकरांस पत्र 6:1-9
मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. “आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.” (अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे). बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतःकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करत जा; माणसांना खूश करणार्या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणार्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा; कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल. धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा; व धमकावण्याचे सोडून द्या, कारण तुम्हांला हे ठाऊक आहे की, तुमचा व त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
इफिसकरांस पत्र 6:1-9