प्रेषितांची कृत्ये 2:37-47
हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?” पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.” आणखी त्याने दुसर्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.
प्रेषितांची कृत्ये 2:37-47