२ करिंथ 9:6-15
हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे. “तो चहूकडे वाटप करीत असतो; दरिद्र्यांस दानधर्म करीत असतो; त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते,” असे शास्त्रात लिहिले आहे. जो ‘पेरणार्याला बी’ पुरवतो व ‘खाण्याकरता अन्न’ पुरवतो तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्या द्वारे देवाचे आभारप्रदर्शन होते. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात; इतकेच केवळ नव्हे, तर तिच्या द्वारे देवाचे अधिकाधिक आभारप्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते. ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, तुम्ही ख्रिस्तसुवार्तेच्या पत्कराबाबत आज्ञाधारकपणा दाखवल्यामुळे आणि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य ह्यांमुळे देवाचा गौरव होतो; आणि तुमच्यावर देवाची अपार कृपा असल्यामुळे ते तुमच्याकरता प्रार्थना करतात, व तुमच्याविषयी उत्कंठा बाळगतात. देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो.
२ करिंथ 9:6-15