१ शमुवेल 2:1-10
हन्ना हिने प्रार्थना केली ती ही : “परमेश्वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायी माझा उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही; कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच; आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही; गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो; कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे; तो सर्व कृती तोलून पाहतो. शूर वीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत; जे लटपटत होते त्यांच्या कंबरेस बलरूप कमरबंद चढवला आहे. जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करत आहेत. जे क्षुधित होते त्यांना आता आराम प्राप्त झाला आहे; वंध्येला सात मुले झाली आहेत; बहुपुत्रवती क्षीण झाली आहे. परमेश्वर प्राण हरण करतो आणि प्राणदानही करतो; तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो; तो अवनत करतो व उन्नतही करतो. तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे. तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील. पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील; कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही. परमेश्वराशी झगडणार्यांचा चुराडा होईल. तो त्यांच्यावर आकाशातून गर्जेल; परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील; तो आपल्या राजाला बल देईल, तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील.”
१ शमुवेल 2:1-10