1 योहान 3:1-18
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्याच्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो; कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हांला माहीत आहे की, आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही. जो कोणी त्याच्या ठायी राहतो तो पाप करत नाही; जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही; कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते; त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका. आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे. ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणही आपल्या बंधूकरता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे. मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत:ला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.
1 योहान 3:1-18