१ इतिहास 29:10-20
दाविदाने सर्व मंडळीदेखत परमेश्वराचा धन्यवाद केला; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आमचा पिता इस्राएल ह्याच्या देवा, तू सदासर्वकाळ धन्य आहेस. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच; हे परमेश्वरा; राज्यही तुझेच; तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुझ्यापासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करतोस; सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत; लोकांना थोर करणे व सर्वांना सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. आम्हांला ह्या प्रकारे स्वेच्छेने अर्पणे करता यावीत असा मी कोण? व माझे लोक तरी कोण? सर्वकाही तुझ्यापासूनच प्राप्त होते; तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यासमोर उपरे व परदेशी आहोत; ह्या भूतलावरील आमचे दिवस छायेप्रमाणे असतात; आमची काही शाश्वती नाही. हे परमेश्वरा, आमच्या देवा, हा जो मोठा निधी आम्ही तुझ्या पवित्र नामाचे मंदिर बांधण्यासाठी जमवला आहे हा तुझ्याच हातून आम्हांला मिळाला आहे; हा सर्व तुझाच आहे. माझ्या देवा, मला ठाऊक आहे की, तुला हृदयाची पारख आहे; सरळता तुला पसंत आहे; मी तर आपल्या सरळ हृदयाने ह्या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पित केल्या आहेत; तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पणे केली आहेत हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे. हे परमेश्वरा, आमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, तुझ्या प्रजाजनांच्या हृदयाच्या ठायी हे विचार व ह्या कल्पना निरंतर वागतील व त्यांची मने तुझ्याकडे नेहमी लागतील असे कर. माझा पुत्र शलमोन ह्याला असे सात्त्विक मन दे की त्याने तुझ्या आज्ञा, तुझे निर्बंध व तुझे नियम पाळून हे सर्वकाही करावे आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे.” मग दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करा.” तेव्हा सर्व मंडळीने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला आणि आपली मस्तके लववून परमेश्वराला व राजाला वंदन केले.
१ इतिहास 29:10-20