YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍या 4:1-14

जखर्‍या 4:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत माझ्याकडे पुन्हा आला व जसे झोपेतून एखाद्यास जागे करतात तसे त्याने मला जागे केले. त्याने मला विचारले, “तुझ्या दृष्टीस काय पडते?” मी म्हणालो, “माझ्या दृष्टीस असे पडते की, एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे, त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला सात दिवे आहेत व त्याच्यावरील सात दिव्यांना सात नळ्या आहेत. आणि त्याच्याजवळ कटोर्‍याच्या उजव्या व डाव्या बाजूंना दोन जैतुनाची झाडे आहेत.” तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला मी विचारले, “माझ्या प्रभो, ही काय आहेत? माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, “ही काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय?” मी म्हणालो, “नाही, माझ्या स्वामी.” तेव्हा त्याने मला उत्तर केले, “जरूब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे महान पर्वता, तू काय आहेस? जरूब्बाबेलपुढे तू सपाट मैदान होशील; व तो ‘त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह,’ असा गजर करत कोनशिला पुढे आणील.” मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे की, “जरूब्बाबेलच्या हातांनी ह्या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधायचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तू समजशील. तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय? ते सात डोळे जरूब्बाबेलच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील; ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात.” मग मी त्याला विचारले, “दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूंना ही दोन जैतुनाची झाडे आहेत ती काय?” दुसर्‍यांदा मी त्याला विचारले, “ह्या दोन सुवर्णाच्या तोट्यांजवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह स्रवणार्‍या ह्या दोन जैतुनाच्या फांद्या काय आहेत?” त्याने मला म्हटले, “त्या काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय?” मी म्हटले, “नाही, माझ्या स्वामी.” तेव्हा त्याने म्हटले, “अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे दोन अभिषिक्त आहेत.”

सामायिक करा
जखर्‍या 4 वाचा

जखर्‍या 4:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने एखाद्या मनुष्यास झोपेतून जागे करतात तसे मला जागे केले. मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला भरीव सोन्याने बनलेला दिपवृक्ष, ज्याच्यावर एक वाटी आहे, असे दिसत आहे. त्यावर सात दिवे आहेत. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते. वाटीच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्येकी एकेक जैतूनाचे झाड आहे.” माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “प्रभू, या गोष्टींचा अर्थ काय?” तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?” मी म्हणालो, “नाही प्रभू.” मग त्याने मला सांगितले हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे तो असा: “बलाने नव्हे अथवा शक्तीने नव्हे तर केवळ माझ्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होईल.” सेनाधीश परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत. “हे उंच पर्वता तू कोण आहेस? तू जरुब्बाबेलासमोर सपाट प्रदेश होशील, तो त्यावर ‘अनुग्रह! अनुग्रह!’ असा गजर करीत शिखर पुढे आणील.” मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, ते असे: “जरुब्बाबेलाने माझ्या मंदिराचा पाया घातला आहे आणि त्याचेच हात हे मंदिर बांधून पूर्ण करतील तेव्हा तू समजशील की सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे. लहानशा आरंभाच्या दिवसास कोणी तुच्छ लेखले आहे काय? हे सात दिवे म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्वकाही पाहतात. आणि ते जरुब्बाबेलाच्या हाती ओळंबा पाहतील व हे लोक मोठा आनंद करतील” मग मी (जखऱ्या) त्यास म्हणालो, “दिपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतूनाचे झाड काय आहेत?” मी त्याच्यासोबत पुन्हा बोललो व म्हणालो, मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय? तेव्हा देवदूताने मला विचारले, “तुला या गोष्टींबद्दल माहीती नाही?” मी म्हणालो, “नाही, महाराज!” तेव्हा देवदूत म्हणाला, “परमेश्वराची सेवा करण्यासाठी संपुर्ण पृथ्वीतून निवडलेल्या दोन अभिषिक्तांची ती प्रतिके आहेत.”

सामायिक करा
जखर्‍या 4 वाचा