तीत 3:1-7
तीत 3:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे; कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे. कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो; परंतु जेव्हा आपला तारणारा देव ह्याची दया व मनुष्यांवरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे; ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे.
तीत 3:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांना असे सुचव की त्यांनी सरकारी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन रहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे. कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी, अशी त्यांना आठवण दे. कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो; पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली, तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्त्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीनिकरणाने तारले. आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला. म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे.
तीत 3:1-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपल्या लोकांना आठवण करून दे की, सत्ता व अधिकारी यांच्या अधीन राहून आज्ञापालन करावे आणि चांगल्या कार्याकरिता नेहमी सिद्ध असावे, त्यांनी कोणाची निंदा करू नये व भांडण करू नये, तर सर्वांशी सौम्यतेने आणि आदराने वागावे. पूर्वी आपण देखील मूर्ख व अवज्ञा करणारे; बहकलेले आणि वाईट सुखाभाग आणि दुष्ट वासना यांचे गुलाम असे होतो. क्रोध व हेवा यांनी आपली जीविते भरून गेली हाती आणि एक दुसर्यांचा द्वेष करणारे असे होतो. जेव्हा आपला तारणारा परमेश्वर यांची दया आणि प्रीती प्रकट होण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी आपले तारण केले, कारण आपण केलेल्या नीतिमानाच्या कृत्यामुळे झाले नाही, तर ते त्यांच्या दयेने झाले आणि आपल्याला नवीन जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण दिले आहे. त्यांनी पवित्र आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त यांच्याद्वारे आपल्यावर विपुलतेने ओतला आहे; म्हणून त्यांच्या कृपेमुळे आपल्याला नीतिमान असे ठरविता आले; आणि त्यांनी दिलेल्या सार्वकालिक जीवनाच्या आशेनुसार आपण वारस व्हावे.
तीत 3:1-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ख्रिस्ती लोकांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, आज्ञाधारक असावे, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे. कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता शांतिप्रिय व स्नेहपूर्ण वर्तन ठेवून सर्व माणसांबरोबर सौजन्याने वागावे, ह्याचे त्यांना स्मरण दे; कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. जेव्हा आपल्याला तारणाऱ्या देवाचा चांगुलपणा व दयाळूपणा प्रकट झाला, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेनुसार त्याने आपले तारण केले, पवित्र आत्म्याद्वारे मिळालेले नव्या जन्माचे स्नान व त्याने केलेले नूतनीकरण ह्यांमधून अभिव्यक्त झाले. देवपित्याने हा पवित्र आत्मा आपल्या तारणाऱ्या येशू खिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करून ज्या शाश्वत जीवनाची आपण आशा धरली आहे, ती प्राप्त करून घ्यावी.