तीत 3:1-15
तीत 3:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांना असे सुचव की त्यांनी सरकारी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन रहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे. कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी, अशी त्यांना आठवण दे. कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो; पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली, तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्त्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीनिकरणाने तारले. आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला. म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे. हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की, तू या गोष्टी निक्षून सांगत जा. म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी. या गोष्टी चांगल्या असून सर्व मनुष्यांसाठी हितकारक आहेत. पण मूर्खपणाचे वाद, वंशावळ, कलह आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत. तुमच्यामध्ये फुट पडणाऱ्या मनुष्यास एकदा व दोनदा बोध केल्यावर आपल्यापासून दूर ठेव. तू जाणतोस की, असा मनुष्य बहकलेला असतो व स्वतः पाप करीत राहिल्याने त्याच्याकडून त्याचा स्वतःचा न्याय होतो. मी अंर्तमाला किंवा तुखिकला तुझ्याकडे धाडून दिल्यावर, तू माझ्याकडे निकापलीस शहरास निघून येण्याचा प्रयत्न कर कारण मी तेथे हिवाळा घालविण्याचे ठरवले आहे. जेना शास्त्री व अपुल्लो ह्यांना काही उणे पडणार नाही अशाप्रकारे पोहोचते कर. आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजांसाठी चांगली कामे करण्यास शिकण्याची काळजी घ्यावी; म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत. माझ्याबरोबरचे सगळे तुला नमस्कार सांगतात. जे आपल्यावर विश्वासामुळे प्रीती करतात त्यांना माझा नमस्कार सांग. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो.
तीत 3:1-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपल्या लोकांना आठवण करून दे की, सत्ता व अधिकारी यांच्या अधीन राहून आज्ञापालन करावे आणि चांगल्या कार्याकरिता नेहमी सिद्ध असावे, त्यांनी कोणाची निंदा करू नये व भांडण करू नये, तर सर्वांशी सौम्यतेने आणि आदराने वागावे. पूर्वी आपण देखील मूर्ख व अवज्ञा करणारे; बहकलेले आणि वाईट सुखाभाग आणि दुष्ट वासना यांचे गुलाम असे होतो. क्रोध व हेवा यांनी आपली जीविते भरून गेली हाती आणि एक दुसर्यांचा द्वेष करणारे असे होतो. जेव्हा आपला तारणारा परमेश्वर यांची दया आणि प्रीती प्रकट होण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी आपले तारण केले, कारण आपण केलेल्या नीतिमानाच्या कृत्यामुळे झाले नाही, तर ते त्यांच्या दयेने झाले आणि आपल्याला नवीन जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण दिले आहे. त्यांनी पवित्र आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त यांच्याद्वारे आपल्यावर विपुलतेने ओतला आहे; म्हणून त्यांच्या कृपेमुळे आपल्याला नीतिमान असे ठरविता आले; आणि त्यांनी दिलेल्या सार्वकालिक जीवनाच्या आशेनुसार आपण वारस व्हावे. मी तुला सांगितलेल्या या सर्वगोष्टी सत्य आहेत आणि या गोष्टींवर विशेष भर देऊन तू त्या सांगाव्या अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगले ते करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी उत्कृष्ट असून प्रत्येकाला लाभदायक आहेत. परंतु नियमशास्त्राबद्दल मूर्खवाद, वंशावळ व युक्तिवाद आणि भांडणे टाळा, कारण हे निरर्थक आणि निरुपयोगी आहेत. तुमच्यामध्ये कोणी तट पाडीत असेल, तर त्याला पहिला व दुसरा इशारा दिला जावा, नंतर त्याच्याशी संबंध ठेवू नये. असा मनुष्य बिघडलेला आहे आणि त्याने स्वतःला दोषी ठरविले असून तो पाप करतो, याची तू खात्री बाळग. अर्तमाला किंवा तुखिकाला मी तुझ्याकडे पाठविल्यानंतर शक्य तितक्या लवकर तू मला व निकोपोलीसला येथे येऊन भेट, कारण मी हिवाळ्यात तेथेच राहण्याचा निश्चय केला आहे. जेनस जो विधि-विशेषज्ञ व अपुल्लोस यांच्या प्रवासासाठी तुमच्याकडून शक्य होईल ती सर्व मदत करा आणि लक्ष ठेवा की, त्यांना लागणार्या गरजेच्या सर्वकाही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. कारण मदतीची गरज असणार्यांना मदत करायला आपल्या लोकांनी शिकले पाहिजे, म्हणजे ते आपल्या दररोजच्या गरजा भागवू शकतील व निष्फळ जीवन जगणार नाही. माझ्याबरोबर असलेला प्रत्येकजण तुला अभिवादन पाठवितो. जे विश्वासात आमच्यावर प्रेम करतात त्यांना सलाम सांगा.
तीत 3:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे; कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे. कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो; परंतु जेव्हा आपला तारणारा देव ह्याची दया व मनुष्यांवरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे; ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे. हे वचन विश्वसनीय आहे, आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे; ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे. ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहेत; परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्रा-विषयीची भांडणे, ह्यांपासून दूर राहा. कारण ती निरुपयोगी व व्यर्थ आहेत. तट पाडणार्या माणसाला एकदा-दोनदा बोध करून मग त्याला वर्ज्य कर; असला माणूस बिघडलेला आहे, आणि त्याने स्वत:च स्वत:ला दोषी ठरवले असून तो पाप करत राहतो, हे तुला ठाऊक आहे. मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवल्यावर होईल तितके करून माझ्याकडे निकपलिसास निघून ये, कारण तेथे हिवाळा घालवण्याचे मी ठरवले आहे. जेना शास्त्री व अपुल्लो ह्यांना काही उणे पडणार नाही अशा तयारीने त्यांना शक्य तितक्या लवकर रवाना कर. आपल्या लोकांनी आपल्या अगत्याच्या गरजा पुरवल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत. माझ्याबरोबरचे सर्व जण तुला सलाम सांगतात. आमच्यावर प्रेम करणार्या सर्व विश्वासणार्यांना सलाम सांग. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो.
तीत 3:1-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ख्रिस्ती लोकांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, आज्ञाधारक असावे, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे. कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता शांतिप्रिय व स्नेहपूर्ण वर्तन ठेवून सर्व माणसांबरोबर सौजन्याने वागावे, ह्याचे त्यांना स्मरण दे; कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. जेव्हा आपल्याला तारणाऱ्या देवाचा चांगुलपणा व दयाळूपणा प्रकट झाला, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेनुसार त्याने आपले तारण केले, पवित्र आत्म्याद्वारे मिळालेले नव्या जन्माचे स्नान व त्याने केलेले नूतनीकरण ह्यांमधून अभिव्यक्त झाले. देवपित्याने हा पवित्र आत्मा आपल्या तारणाऱ्या येशू खिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करून ज्या शाश्वत जीवनाची आपण आशा धरली आहे, ती प्राप्त करून घ्यावी. हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत राहावे, अशी माझी इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करीत राहावे कारण ही कृत्ये सर्वांकरता उचित व हितकारक आहेत परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयींची भांडणे, ह्यांपासून दूर राहा कारण ती अहितकारक व व्यर्थ आहेत. तट पाडणाऱ्या माणसाला निदान दोनदा इशारा दे आणि नंतर त्यांच्याशी संबंध ठेवू नको. असला माणूस विकृत आहे, हे तुला ठाऊक आहे आणि त्याची पापे त्याचा न्यायनिवाडा करतात. मी अर्तमला किंवा तुखिकला तुझ्याकडे पाठविल्यावर जमेल तितक्या लवकर तू माझ्याकडे निकपलिस येथे निघून ये, कारण तेथे हिवाळा घालविण्याचे मी ठरविले आहे. जेना वकील व अपुल्लो ह्यांना काही उणीव भासणार नाही अशा तयारीने शक्य तितक्या लवकर रवाना कर. आपल्या लोकांनी आपल्या निकडीच्या गरजा पुरविल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत. माझ्याबरोबर असलेले सर्व जण तुला शुभेच्छा कळवतात. आपल्या श्रद्धावंत स्नेह्यांना आमच्या शुभेच्छा कळव. तुम्हां सर्वांवर देवाची कृपा असो.