तीत 1:1-16
तीत 1:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीत ह्याला : जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणार्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले, त्या जीवनाची आशा बाळगणार्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल ह्याच्याकडून : देवपित्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा ह्याच्यापासून कृपा, दया व शांती असो. मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुर्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावीस, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील1 नेमावेत. ज्याला नेमायचे तो निर्दोष, एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत. अध्यक्ष2 हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे; तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनीतीने पैसे मिळवणारा नसावा; तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी, आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा; ह्यासाठी की, त्याने सुशिक्षणाने बोध करण्यास व उलट बोलणार्यांना कुंठित करण्यासही समर्थ व्हावे. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत; त्यांत विशेषेकरून सुंता झालेल्यांपैकी आहेत; त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळवण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करतात. त्या लोकांतील त्यांचाच कोणीएक संदेष्टा म्हणतो, “क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशू, आळशी व खादाड असतात.” ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल, ह्यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा ह्यांकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे. शुद्ध जनांस सर्वकाही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे ह्यांना काहीच शुद्ध नाही; त्यांची बुद्धी व विवेकभाव ही विटाळलेली आहेत. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात; परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.
तीत 1:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल, ह्याच्याकडूनः जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले, त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीदायक सत्याच्या ज्ञानासाठी, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले. आपल्या सामाईक असलेल्या विश्वासाप्रमाणे माझे खरे लेकरू तीत यास; देवपित्यापासून व आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती असो. मी तुला क्रेत बेटावर ह्यासाठी ठेवून आलो की, तू पूर्ण न झालेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरांत वडील नेमावे. ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी. अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा, तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका अनीतीने पैसे मिळविणारा नसावा; तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा; मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी, आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्यास धरुन राहणारा असा असावा; यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तीमान व्हावे. हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांस फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात. त्यांच्यामधील एका संदेष्ट्याने म्हणले आहे की, ‘क्रेती लोक हे नेहमीच लबाड, पशुंसारखे खतरनाक, आळशी व खादाड आहेत.’ ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर. यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्यांकडे आणि सत्याकडून वळविणार्या, मनुष्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये. विश्वासात खंबीर व्हावे. जे शुद्ध आहेत अशा लोकांस सर्व गोष्टी शुद्ध आहेत पण जे विटाळलेले आहेत आणि विश्वास ठेवत नाहीत अशांना काहीच शुद्ध नाही पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलीन आहेत. ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.
तीत 1:1-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी आणि त्यांना भक्तिच्या मार्गावर नेणार्या सत्याच्या ज्ञानासाठी नेमलेला परमेश्वराचा दास व येशू ख्रिस्ताचे प्रेषित पौल याच्याकडून, परमेश्वर जे कधीही खोटे बोलत नाहीत, त्यांनी सार्वकालिक जीवनाच्या आशेचे अभिवचन सुरवातीच्या काळाच्या आधीपासून दिले आणि आता ते त्यांच्या नियोजित वेळेनुसार प्रचाराद्वारे प्रकाशात आणले जे आपल्या तारणार्या परमेश्वराच्या आज्ञेने मला सोपविण्यात आले. आमच्यासारखाच विश्वासात असलेला माझा खरा पुत्र तीत याला: परमेश्वर पिता आणि आपला तारणारा ख्रिस्त येशू यांच्याकडून कृपा व शांती असो. मी तुला क्रेत बेटावर सोडले त्यामुळे तू तेथील उर्वरित कार्याची संपूर्ण व्यवस्था करावी आणि माझ्या आज्ञानुसार प्रत्येक नगरात मंडळीचे वडील नेमावे. जो निर्दोष आणि एकाच स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वासणारी असून त्यावर दुराचाराचा व ती अनावर असल्याचा आरोप नसावा. अध्यक्ष हे परमेश्वराच्या घराचे कारभारी आहेत म्हणून त्यांचे जीवन निर्दोष असावे. तर स्वच्छंदी अथवा लवकर रागास येणारे, मद्यपी अथवा भांडखोर, किंवा अनीतिने धन मिळविणारे नसावेत. ते पाहुणचार करण्याची आवड असणारे, चांगल्या गोष्टींवर प्रेम करणारे, इंद्रियदमन करणारे, सरळ, पवित्र आणि शिस्तबद्ध असावे. त्याने शिकविल्याप्रमाणे विश्वासू संदेश दृढपणे धरून ठेवले पाहिजे, जेणेकरून ते चांगल्या शिकवणीने इतरांना प्रोत्साहन देणारे आणि जे विरोध करतात त्यांना खंडणी देणारे असावे. कारण अनावर, व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ असे आहेत, त्यांच्यात विशेषकरून सुंता झालेल्या गटाचे आहेत. त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; कारण अप्रामाणिक लाभासाठी जे शिकवू नये ते शिकवून ते संपूर्ण घराण्यांची उलथापालथ करीत आहेत. त्यांच्याच कोणाएका संदेष्ट्याने सांगितले आहे, “हे क्रेतातील सर्व लोक लबाड, दुष्ट पशू, आळशी खादाड आहेत.” हा संदेश अगदी खरा आहे. यास्तव त्यांनी विश्वासात दृढ व्हावे, आणि यहूदी लोककथा ऐकून आणि सत्याकडे पाठ फिरवलेल्या लोकांच्या आज्ञा पाळणे, हे त्यांनी थांबवावे म्हणून त्यांना आवश्यक तितक्या कडकपणे ताकीद दे. शुद्ध लोकांसाठी सर्वगोष्टी शुद्ध आहेत, तर भ्रष्ट आणि विश्वास नसलेल्या लोकांसाठी काहीही शुद्ध नाही. कारण त्यांचे मन आणि विवेकभाव हे दोन्ही अशुद्ध आहेत. ते परमेश्वराला ओळखतात असा दावा करतात, परंतु त्यांच्या कृत्याने ते चुकीचे सिद्ध होते. ते घृणास्पद, आज्ञा न पाळणारे आणि कोणत्याही चांगल्या कार्यासाठी अयोग्य आहेत.
तीत 1:1-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले. हे सत्य शाश्वत जीवनाच्या आशेवर आधारलेले असून सत्यवचनी परमेश्वराने काळाच्या प्रारंभापूर्वी ह्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले आणि उचित समयी त्याच्या संदेशात ते त्याने प्रकट केले. हा संदेश माझ्याकडे सोपविण्यात आला होता व मी आपल्या तारणाऱ्या देवाच्या आदेशानुसार तो जाहीर करीत आहे. हे पत्र मी तीतला लिहिले आहे. ज्या श्रद्धेत आम्ही सहभागी झालो आहोत त्या श्रद्धेत तो माझा खराखुरा पुत्र आहे. देवपिता व आपला तारणारा येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो. मी तुला क्रे त येथे ह्यासाठी सोडून आलो की, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला दिलेल्या आदेशानुसार तू प्रत्येक नगरात वडीलजन नेमावेत. ज्याला नेमावयाचा तो निर्दोष असावा; तो एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत व त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसावा, ती बंडखोर नसावीत. ख्रिस्तमंडळीचा बिशप हा देवाचा कारभारी आहे, म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो उर्मट, रागीट, मद्यपी, हिंसक व पैशासाठी हपापलेला नसावा, तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, सुज्ञ, नीतिमान, भक्तिमान, शिस्तप्रिय आणि दिलेल्या शिक्षणानुसार विश्वसनीय वचनाला धरून राहणारा असावा; ह्यासाठी की, त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व विरोधकांना निरुत्तर करावयासही समर्थ व्हावे. पुष्कळ लोक निरर्थक बडबड करीत बंडखोरपणाने वागतात व काही लोकांना फसवितात. सुंता झालेल्या लोकांमधून धर्मांतरित झालेल्यांचा अशा लोकांमध्ये विशेषकरून समावेश आहे. त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळविण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्यांच्या विश्वासाचा नाश करतात. त्या लोकांतील त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो की, क्रेत येथील लोक सदा लबाड, दुष्ट, पाशवी, आळशी व खादाड असतात. ही साक्ष खरी आहे, म्हणून त्यांच्या पदरी स्पष्ट दोष घाल, ह्यासाठी की, त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांचे आदेश ह्यांकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे. शुद्ध लोकांना सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे ह्यांना काहीच शुद्ध नाही. त्यांचे मन व सदसद्विवेक बुद्धी ही विटाळलेली आहेत. आपण देवाला ओळखतो असे ते जाहीर करतात परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते तिरस्करणीय व आज्ञाभंग करणारे असून प्रत्येक चांगल्या कामासाठी अपात्र आहेत.