YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रूथ 2:1-17

रूथ 2:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता; तो अलीमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान मनुष्य होता, त्याचे नाव बवाज असे होते. मवाबी रूथ नामीला म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या, म्हणजे ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल त्याच्यामागे मी धान्याचा सरवा वेचीत जाईन.” तेव्हा तिने म्हटले, “माझ्या मुली, जा.” मग ती निघून शेतात गेली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे धान्य वेचू लागली, तेव्हा असे झाले की, शेताच्या ज्या भागात ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातला बवाज याचा होता. आणि पाहा, बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला, तेव्हा तो कापणी करणाऱ्यांना म्हणाला, “परमेश्वर तुम्हाबरोबर असो,” आणि त्यांनी उत्तर दिले “परमेश्वर तुला आशीर्वादित करो.” मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या देखरेख करणाऱ्या दासास म्हणाला, “ही तरुण स्त्री कोण आहे?” कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्या दासाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी कन्या आहे. ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या.’ ती सकाळपासून आतापर्यंत तो वेचीत आहे, आत्ताच येथे थोडा वेळ मात्र विश्रांती घेण्यासाठी ती येथे आली आहे.” बवाज रूथला म्हणाला, “मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचायला जाऊ नकोस, येथेच माझ्या काम करणाऱ्या तरुण स्त्रियांबरोबर राहा. हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा. मी या लोकांस तुला त्रास देऊ नये अशी सूचना दिली आहे ना? आणि तुला तहान लागल्यास पाण्याच्या भांड्याकडे जाऊन नोकरांनी जे पाणी भरून ठेवले त्यातील पाणी पी.” तेव्हा ती बवाजापुढे दंडवत घालून म्हणाली, “मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय?” बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मरण पावल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस आणि तू आपल्या आई-वडिलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परिचित नाहीत अशा लोकात तू आलीस ही सविस्तर माहिती मला मिळाली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे फळ तुला देवो. ज्याच्या पंखाचा आश्रय करावयास तू आली आहेस तो इस्राएलाचा देव परमेश्वर तुला पुरे पारितोषिक देवो.” मग ती म्हणाली, “माझ्या प्रभू, आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.” भोजन करतेवेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा. या कढीत आपली भाकर बुडव.” कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीला ती बसली व त्याने तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. ती सरवा वेचावयास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्याला सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका. आणि चालता चालता पेंढ्यांतून मूठमूठ टाकत जा; तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.” तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा झोडिला त्याचे एफाभर सातू निघाले.

सामायिक करा
रूथ 2 वाचा

रूथ 2:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नामीच्या नवर्‍याचा एक नातेवाईक होता, तो अलीमलेख ह्याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता आणि त्याचे नाव बवाज असे होते. मवाबी रूथ नामीस म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचत जाईन; ती म्हणाली, “मुली जा. ती जाऊन शेतात कापणी करणार्‍यांच्या मागून सरवा वेचू लागली. आणि असे झाले की, शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता. बवाज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणार्‍यांना म्हणाला, “परमेश्वर तुमच्याबरोबर असो.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर तुमचे अभीष्ट करो.” मग बवाज कापणी करणार्‍यांच्या मुकादमाला म्हणाला, “ही मुलगी कोणाची?” कापणी करणार्‍यांच्या मुकादमाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशातून आलेली ही मवाबी मुलगी होय. ती मला म्हणाली, ’कृपा करून कापणी करणार्‍यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या; ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचत आहे, थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती.”’ बवाज रूथला म्हणाला, “मुली, ऐकतेस ना? तू दुसर्‍याच्या शेतात सरवा वेचायला येथून जाऊ नकोस; येथेच माझ्या मोलकरणींबरोबर राहा. हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा; तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी ह्या गड्यांना दिली नाही काय? तुला तहान लागल्यास तू भांड्यांकडे जाऊन ह्या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी.” तेव्हा ती त्याला दंडवत घालून म्हणाली, “माझ्यासारख्या परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतलात ह्याचे काय कारण बरे?” बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली मातापितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकांत आलीस ही सविस्तर हकिकत मला समजली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या पंखांखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो.” ती म्हणाली, “महाराज आपली कृपादृष्टी माझ्यावर राहू द्यावी; मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.” भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा; ह्या कढीत आपली भाकर बुडव.” त्या कापणी करणार्‍यांच्या पंक्तीला ती बसली. त्यांनी तिला हुरडा दिला; तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. ती सरवा वेचायला निघाली तेव्हा बवाजने आपल्या गड्यांना सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका; आणि चालता चालता पेंढ्यांतून मूठमूठ टाकत जा; तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.” तिने ह्या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा वेचला. तिने वेचून आणलेला सरवा झोडला, त्याचे एफाभर सातू निघाले.

सामायिक करा
रूथ 2 वाचा