YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 8:22-30

रोमकरांस पत्र 8:22-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत कण्हत व यातना सोशीत आहे. आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची, म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहोत. कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशाही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का? पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो. त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात पवित्र आत्माही आपल्याला सहाय्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आणि, जो अंतःकरणे शोधून पाहतो तो पवित्र आत्म्याचे मन जाणतो, कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो. कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात. कारण त्यास ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे. आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.

रोमकरांस पत्र 8:22-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

कारण आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण सृष्टी प्रसूती वेदनांच्या क्लेशांप्रमाणे आतापर्यंत कण्हत आहे. ज्या आपणाला आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे, ते आपणही कण्हत आहोत, आपण देखील त्या परमेश्वराची दत्तक मुले म्हणून आपल्या शरीराचा उद्धार होईल त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत, आणि या आशेमध्येच आपण तारण पावलो आहोत. जी आशा दृश्य आहे ती आशाच नव्हे. जे काही आहे त्याची आशा कोण धरेल? पण जे अद्यापि प्राप्त झाले नाही त्याबद्दल आशा ठेवतो, तर आपण धीराने वाट पाहतो. त्याच प्रकारे, पवित्र आत्माही आपल्या अशक्तपणात आपणास साहाय्य करतो. कारण प्रार्थना कशासाठी करावी हे आपल्याला समजत नाही, पण पवित्र आत्मा आपल्यासाठी शब्दाविना कण्हण्याने मध्यस्थी करतो. आणि जो आपली अंतःकरणे शोधतो तो आत्म्याचे मन जाणतो, कारण आत्मा परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वराच्या लोकांसाठी मध्यस्थी करतो. आणि आपल्याला माहीत आहे की, परमेश्वरावर प्रीती करणारे आणि जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्या कल्याणार्थ सर्वगोष्टी सहकारी ठरतात. ज्यांच्याविषयी परमेश्वराला पूर्वज्ञान होते व त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हावे, यासाठी त्यांना पूर्वनियोजित केले होते की त्यांनी अनेक बंधू आणि भगिनीमध्ये ज्येष्ठ असे व्हावे. आणि त्यांनी ज्यांना पूर्वनियोजित केले, त्यांना बोलाविले; व ज्यांना बोलाविले, त्यांना नीतिमान ठरविले व ज्यांना नीतिमान ठरविले, त्यांचे त्यांनी गौरव ही केले.

रोमकरांस पत्र 8:22-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहोत. कारण आपण अशी आशा धरून तरलो; जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. आणि अंतर्यामे पारखणार्‍याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला.

रोमकरांस पत्र 8:22-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आपल्याला ठाऊक आहे की, सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, ते आपणही स्वतः दत्तक होण्याची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता, आपल्यामध्ये कण्हत आहोत. आशेने आपले तारण झाले आहे. जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण जे अदृश्य आहे, त्याची जर आपण आशा धरली, तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे, हे आपल्याला ठाऊक नसते. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. अंतर्याम पारखणाऱ्या देवाला त्या आत्म्याचा हेतू काय, हे ठाऊक आहे. पवित्र आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करतो. आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांना देवाच्या कृतीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात; कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले आहे. त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला.