YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 8:15-25

रोमकरांस पत्र 8:15-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे. तो आत्मा स्वत: आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत; आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दु:ख भोगत असलो तरच. कारण आपल्यासाठी1 जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणार्‍यामुळे. सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहोत. कारण आपण अशी आशा धरून तरलो; जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.

रोमकरांस पत्र 8:15-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत. आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण दुख तर सोसले वारीस आहोत. कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत. कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली; कारण सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल. कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत कण्हत व यातना सोशीत आहे. आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची, म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहोत. कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशाही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का? पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो.

रोमकरांस पत्र 8:15-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, “अब्बा, बापा” अशी हाक मारू शकता. कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत. ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ. तर आपल्याला पुढे जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या तुलनेने वर्तमान काळातील दुःखे काहीच नाहीत. कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे. कारण सृष्टी स्वतःच्या निवडीनुसार निराशेच्या स्वाधीन नाही, तर त्यांनी तिला या आशेच्या स्वाधीन ठेवले ते, यासाठी की स्वतः सृष्टी विनाशाच्या दास्यत्वातून मोकळी होईल आणि परमेश्वराच्या मुलांना मिळणार्‍या स्वतंत्रेत व गौरवात सहभागी होईल. कारण आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण सृष्टी प्रसूतिवेदनांच्या क्लेशांप्रमाणे आतापर्यंत कण्हत आहे. ज्या आपणाला आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे, ते आपणही कण्हत आहोत, आपण देखील त्या परमेश्वराची दत्तक मुले म्हणून आपल्या शरीराचा उद्धार होईल त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत, आणि या आशेमध्येच आपण तारण पावलो आहो. जी आशा दृश्य आहे ती आशाच नव्हे. जे काही आहे त्याची आशा कोण धरेल? पण जे अद्यापि प्राप्त झाले नाही त्याबद्दल आशा ठेवतो, तर आपण धीराने वाट पाहतो.

रोमकरांस पत्र 8:15-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही, तर ज्याच्यायोगे आपण “अब्बा, बापा!” अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे. तो आत्मा आपल्या आत्म्याबरोबर स्वतः साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत आणि जर मुले तर वारस, म्हणजे देवाचे वारस आणि ख्रिस्ताबरोबर संयुक्त वारस आहोत; कारण आपण जर ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी झालो तर आपल्याला त्याच्या वैभवातदेखील सहभाग मिळेल. आपल्यासाठी जे वैभव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे वर्तमानकाळाची दुःखे काहीच नाहीत, असे मी मानतो. सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवशाली मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. आपल्याला ठाऊक आहे की, सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, ते आपणही स्वतः दत्तक होण्याची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता, आपल्यामध्ये कण्हत आहोत. आशेने आपले तारण झाले आहे. जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण जे अदृश्य आहे, त्याची जर आपण आशा धरली, तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.