रोमकरांस पत्र 8:14-19
रोमकरांस पत्र 8:14-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे. तो आत्मा स्वत: आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत; आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दु:ख भोगत असलो तरच. कारण आपल्यासाठी1 जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे.
रोमकरांस पत्र 8:14-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत. आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण दुख तर सोसले वारीस आहोत. कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत. कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे.
रोमकरांस पत्र 8:14-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो, ती परमेश्वराची लेकरे आहेत, पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, “अब्बा, बापा” अशी हाक मारू शकता. कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत. ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ. तर आपल्याला पुढे जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या तुलनेने वर्तमान काळातील दुःखे काहीच नाहीत. कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे.
रोमकरांस पत्र 8:14-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनुसार चालतात ते देवाचे पुत्र आहेत. भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही, तर ज्याच्यायोगे आपण “अब्बा, बापा!” अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे. तो आत्मा आपल्या आत्म्याबरोबर स्वतः साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत आणि जर मुले तर वारस, म्हणजे देवाचे वारस आणि ख्रिस्ताबरोबर संयुक्त वारस आहोत; कारण आपण जर ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी झालो तर आपल्याला त्याच्या वैभवातदेखील सहभाग मिळेल. आपल्यासाठी जे वैभव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे वर्तमानकाळाची दुःखे काहीच नाहीत, असे मी मानतो. सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे.