YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 8:1-39

रोमकरांस पत्र 8:1-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले. कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली. म्हणजे आपण जे देहाला अनुसरून नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी. कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात. देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती. कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही. म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत. पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहात कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही. पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मरण पावलेले आहे, पण नीतिमत्त्वामुळे आत्मा जीवन आहे. पण ज्याने येशूला मरण पावलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्‍या, आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील. म्हणून बंधूंनो आपण देणेकरी आहोत; पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल. कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत. आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण दुख तर सोसले वारीस आहोत. कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत. कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली; कारण सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल. कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत कण्हत व यातना सोशीत आहे. आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची, म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहोत. कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशाही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का? पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो. त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात पवित्र आत्माही आपल्याला सहाय्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आणि, जो अंतःकरणे शोधून पाहतो तो पवित्र आत्म्याचे मन जाणतो, कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो. कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात. कारण त्यास ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे. आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले. मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण? आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्यास दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही? देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे. दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मरण पावला, हो, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’ पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्‍या गोष्टी किंवा बले, किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.

रोमकरांस पत्र 8:1-39 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यास्तव, जे आता ख्रिस्त येशूंमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. कारण ख्रिस्त येशूंच्याद्वारे आत्म्याच्या नियमाने जे तुम्हाला जीवन देतात, त्यांनी तुम्हाला पापाचे नियम व मरण यातून मुक्त केले आहे. कारण आपल्या पापी स्वभावामुळे आपल्याला वाचवण्यास नियम असमर्थ होते, तेव्हा परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला पापमय मनुष्यासारखे व पापबली म्हणून पाठविले व मानवी स्वभावात जे पाप राज्य करीत होते त्याला दोषी ठरविले. यासाठी की जे देहाने नव्हे तर पवित्र आत्म्याप्रमाणे जीवन जगतात, त्यांच्यामध्ये नियमांसाठी आवश्यक असणारे नीतिमत्व पूर्ण व्हावे. जे आपल्या शारीरिक स्वभावाला अनुसरून जीवन जगतात, त्यांची मने दैहिक गोष्टींकडे असतात, परंतु जे पवित्र आत्म्याला अनुसरून जीवन जगतात त्यांची मने आत्म्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकडे असतात. मन दैहिक असणे म्हणजे मरण आहे; पवित्र आत्म्याने नियंत्रित मनाला जीवन व शांती लाभते, कारण दैहिक मन परमेश्वरविरोधी आहे; ते परमेश्वराच्या नियमाच्या अधीन होत नाही आणि कधीही होणार नाही. जे देहाच्या सत्तेखाली आहेत ते परमेश्वराला संतुष्ट करू शकणार नाहीत. तुम्ही देहाच्या सत्तेखाली नाही, परंतु जर परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही आत्म्याच्या सत्तेखाली आहात, जर कोणामध्ये ख्रिस्ताचा आत्मा वास करीत नाही, तर तो ख्रिस्ताचा नाही. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, आणि पापामुळे तुमचे शरीर मरण पावले; पण नीतिमत्वामुळे तुमचा आत्मा जिवंत राहील. आणि ज्यांनी येशूंना मेलेल्यातून उठविले, त्यांचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल, तर ज्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले ते तुमच्यामध्ये राहात असणार्‍या त्याच पवित्र आत्म्याच्याद्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतील. यास्तव, बंधुंनो आणि भगिनींनो, आपण ऋणी आहोत, परंतु देहस्वभावाप्रमाणे जगण्यास देहाचे ऋणी नाही. कारण तुम्ही देहस्वभावाप्रमाणे वागत राहिला, तर मराल. पण पवित्र आत्म्याच्या शक्तीने दैहिक कुकर्मे नष्ट केलीत, तर जगाल. कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो, ती परमेश्वराची लेकरे आहेत, पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, “अब्बा, बापा” अशी हाक मारू शकता. कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत. ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ. तर आपल्याला पुढे जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या तुलनेने वर्तमान काळातील दुःखे काहीच नाहीत. कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे. कारण सृष्टी स्वतःच्या निवडीनुसार निराशेच्या स्वाधीन नाही, तर त्यांनी तिला या आशेच्या स्वाधीन ठेवले ते, यासाठी की स्वतः सृष्टी विनाशाच्या दास्यत्वातून मोकळी होईल आणि परमेश्वराच्या मुलांना मिळणार्‍या स्वतंत्रेत व गौरवात सहभागी होईल. कारण आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण सृष्टी प्रसूतिवेदनांच्या क्लेशांप्रमाणे आतापर्यंत कण्हत आहे. ज्या आपणाला आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे, ते आपणही कण्हत आहोत, आपण देखील त्या परमेश्वराची दत्तक मुले म्हणून आपल्या शरीराचा उद्धार होईल त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत, आणि या आशेमध्येच आपण तारण पावलो आहो. जी आशा दृश्य आहे ती आशाच नव्हे. जे काही आहे त्याची आशा कोण धरेल? पण जे अद्यापि प्राप्त झाले नाही त्याबद्दल आशा ठेवतो, तर आपण धीराने वाट पाहतो. त्याचप्रकारे, पवित्र आत्माही आपल्या अशक्तपणात आपणास साहाय्य करतो. कारण प्रार्थना कशासाठी करावी हे आपल्याला समजत नाही, पण पवित्र आत्मा आपल्यासाठी शब्दाविना कण्हण्याने मध्यस्थी करतो. आणि जो आपली अंतःकरणे शोधतो तो आत्म्याचे मन जाणतो, कारण आत्मा परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वराच्या लोकांसाठी मध्यस्थी करतो. आणि आपल्याला माहीत आहे की, परमेश्वरावर प्रीती करणारे आणि जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्या कल्याणार्थ सर्वगोष्टी सहकारी ठरतात. ज्यांच्याविषयी परमेश्वराला पूर्वज्ञान होते व त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हावे, यासाठी त्यांना पूर्वनियोजित केले होते की त्यांनी अनेक बंधू आणि भगिनीमध्ये जेष्ठ असे व्हावे. आणि त्यांनी ज्यांना पूर्वनियोजित केले, त्यांना बोलावले; व ज्यांना बोलावले, त्यांना नीतिमान ठरविले व ज्यांना नीतिमान ठरविले, त्यांचे त्यांनी गौरव ही केले. अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल? ज्यांनी स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्यांना दिले, तर ते आपल्याला त्यांच्यासोबत सर्वकाही उदारतेने देणार नाहीत काय? परमेश्वराने ज्यांना निवडले आहे त्यांच्यावर आरोप करण्यास कोण धजेल? नीतिमान ठरविणारे ते परमेश्वरच आहेत. तर असा कोण आहे जो आपल्याला दंडाज्ञा देईल? कोणी नाही. ख्रिस्त येशू जे मरण पावले, इतकेच नव्हे तर जिवंत असे उठविले गेले आणि तेच आता परमेश्वराच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहेत. मग ख्रिस्ताच्या प्रीतिपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय? कारण असे लिहिले आहे: “तुझ्यासाठी आम्ही दिवसभर मरणाला तोंड देतो, वधाची प्रतीक्षा करणार्‍या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.” नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत. कारण माझी खात्री आहे की न मरण न जीवन, न देवदूत न भुते, न वर्तमान न भविष्यकाळ, न कोणती शक्ती, अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपला प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतिपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.

रोमकरांस पत्र 8:1-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. [ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.] कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली; ह्यात उद्देश हा की, जे आपण देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. कारण जे देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वसती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुमच्यामध्ये वसती करणार्‍या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. तर मग बंधुजनहो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देहस्वभावाप्रमाणे जगायला देहस्वभावाचे ऋणी नाही; कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात; परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे. तो आत्मा स्वत: आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत; आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दु:ख भोगत असलो तरच. कारण आपल्यासाठी1 जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणार्‍यामुळे. सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहोत. कारण आपण अशी आशा धरून तरलो; जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. आणि अंतर्यामे पारखणार्‍याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला. तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे; कापायच्या मेंढरासारखे आम्हांला गणले आहे.” उलटपक्षी, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही.

रोमकरांस पत्र 8:1-39 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. कारण ख्रिस्त येशूमध्ये जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. देहाच्या दुर्बलतेप्रमाणे नियमशास्त्र जे करू शकले नाही, ते देवाने केले. ह्यासाठी त्याने त्याचा पुत्र, पापमय देहासारख्या देहाने पाठवून, पाप दूर करण्यासाठी देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली. ह्यांत उद्देश हा की, जे आपण देहानुसार नव्हे तर पवित्र आत्म्यानुसार चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. जे देहानुसार आहेत, ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे पवित्र आत्म्यानुसार चालतात, ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. दैहिक गोष्टींचा ध्यास घेणे हे मरण आहे. परंतु पवित्र आत्म्याचा ध्यास घेणे हे जीवन व शांती आहे. देहाचा ध्यास म्हणजे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येणार नाही. जे देहाच्या अधीन आहेत, त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. मात्र तुमच्यामध्ये देवाचा आत्मा जर वसती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही; आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही. परंतु ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर पापामुळे शरीर जरी मेलेले असले, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले, तो तुमच्यामध्ये वसती करणाऱ्या त्याच्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. तर मग बंधुजनहो, आपण ऋणी आहोत खरे, पण देहस्वभावाप्रमाणे जगावयाला आपण देहस्वभावाचे ऋणी नाहीत. जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कृत्ये ठार मारलीत तर जगाल. जे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनुसार चालतात ते देवाचे पुत्र आहेत. भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही, तर ज्याच्यायोगे आपण “अब्बा, बापा!” अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे. तो आत्मा आपल्या आत्म्याबरोबर स्वतः साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत आणि जर मुले तर वारस, म्हणजे देवाचे वारस आणि ख्रिस्ताबरोबर संयुक्त वारस आहोत; कारण आपण जर ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी झालो तर आपल्याला त्याच्या वैभवातदेखील सहभाग मिळेल. आपल्यासाठी जे वैभव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे वर्तमानकाळाची दुःखे काहीच नाहीत, असे मी मानतो. सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवशाली मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. आपल्याला ठाऊक आहे की, सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, ते आपणही स्वतः दत्तक होण्याची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता, आपल्यामध्ये कण्हत आहोत. आशेने आपले तारण झाले आहे. जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण जे अदृश्य आहे, त्याची जर आपण आशा धरली, तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे, हे आपल्याला ठाऊक नसते. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. अंतर्याम पारखणाऱ्या देवाला त्या आत्म्याचा हेतू काय, हे ठाऊक आहे. पवित्र आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करतो. आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांना देवाच्या कृतीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात; कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले आहे. त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला. तर मग ह्या गोष्टींवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही देणार नाही काय? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मरण पावला इतकेच नव्हे तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. तर मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? अडचणी, तणाव, दुष्काळ, छळ, दारिद्र्य, संकट किंवा तलवार ह्या गोष्टी विभक्त करतील काय? धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: तुझ्यामुळे आम्ही नेहमीच मरणाच्या धोक्यात असतो. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हांला गणले जाते. उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो! कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, बले, वर्तमानकाळाच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, उंची किंवा खोली, इतर कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करू शकणार नाही.

रोमकरांस पत्र 8:1-39

रोमकरांस पत्र 8:1-39 MARVBSIरोमकरांस पत्र 8:1-39 MARVBSIरोमकरांस पत्र 8:1-39 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा