YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 8:1-11

रोमकरांस पत्र 8:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले. कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली. म्हणजे आपण जे देहाला अनुसरून नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी. कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात. देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती. कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही. म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत. पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहात कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही. पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मरण पावलेले आहे, पण नीतिमत्त्वामुळे आत्मा जीवन आहे. पण ज्याने येशूला मरण पावलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्‍या, आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील.

रोमकरांस पत्र 8:1-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यास्तव, जे आता ख्रिस्त येशूंमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. कारण ख्रिस्त येशूंच्याद्वारे आत्म्याच्या नियमाने जे तुम्हाला जीवन देतात, त्यांनी तुम्हाला पापाचे नियम व मरण यातून मुक्त केले आहे. कारण आपल्या पापी स्वभावामुळे आपल्याला वाचवण्यास नियम असमर्थ होते, तेव्हा परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला पापमय मनुष्यासारखे व पापबली म्हणून पाठविले व मानवी स्वभावात जे पाप राज्य करीत होते त्याला दोषी ठरविले. यासाठी की जे देहाने नव्हे तर पवित्र आत्म्याप्रमाणे जीवन जगतात, त्यांच्यामध्ये नियमांसाठी आवश्यक असणारे नीतिमत्व पूर्ण व्हावे. जे आपल्या शारीरिक स्वभावाला अनुसरून जीवन जगतात, त्यांची मने दैहिक गोष्टींकडे असतात, परंतु जे पवित्र आत्म्याला अनुसरून जीवन जगतात त्यांची मने आत्म्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकडे असतात. मन दैहिक असणे म्हणजे मरण आहे; पवित्र आत्म्याने नियंत्रित मनाला जीवन व शांती लाभते, कारण दैहिक मन परमेश्वरविरोधी आहे; ते परमेश्वराच्या नियमाच्या अधीन होत नाही आणि कधीही होणार नाही. जे देहाच्या सत्तेखाली आहेत ते परमेश्वराला संतुष्ट करू शकणार नाहीत. तुम्ही देहाच्या सत्तेखाली नाही, परंतु जर परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही आत्म्याच्या सत्तेखाली आहात, जर कोणामध्ये ख्रिस्ताचा आत्मा वास करीत नाही, तर तो ख्रिस्ताचा नाही. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, आणि पापामुळे तुमचे शरीर मरण पावले; पण नीतिमत्वामुळे तुमचा आत्मा जिवंत राहील. आणि ज्यांनी येशूंना मेलेल्यातून उठविले, त्यांचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल, तर ज्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले ते तुमच्यामध्ये राहात असणार्‍या त्याच पवित्र आत्म्याच्याद्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतील.

रोमकरांस पत्र 8:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. [ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.] कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली; ह्यात उद्देश हा की, जे आपण देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. कारण जे देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वसती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुमच्यामध्ये वसती करणार्‍या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.

रोमकरांस पत्र 8:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. कारण ख्रिस्त येशूमध्ये जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. देहाच्या दुर्बलतेप्रमाणे नियमशास्त्र जे करू शकले नाही, ते देवाने केले. ह्यासाठी त्याने त्याचा पुत्र, पापमय देहासारख्या देहाने पाठवून, पाप दूर करण्यासाठी देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली. ह्यांत उद्देश हा की, जे आपण देहानुसार नव्हे तर पवित्र आत्म्यानुसार चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. जे देहानुसार आहेत, ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे पवित्र आत्म्यानुसार चालतात, ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. दैहिक गोष्टींचा ध्यास घेणे हे मरण आहे. परंतु पवित्र आत्म्याचा ध्यास घेणे हे जीवन व शांती आहे. देहाचा ध्यास म्हणजे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येणार नाही. जे देहाच्या अधीन आहेत, त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. मात्र तुमच्यामध्ये देवाचा आत्मा जर वसती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही; आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही. परंतु ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर पापामुळे शरीर जरी मेलेले असले, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले, तो तुमच्यामध्ये वसती करणाऱ्या त्याच्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.

रोमकरांस पत्र 8:1-11

रोमकरांस पत्र 8:1-11 MARVBSIरोमकरांस पत्र 8:1-11 MARVBSIरोमकरांस पत्र 8:1-11 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा