रोमकरांस पत्र 6:5-23
रोमकरांस पत्र 6:5-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले होऊ. आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे. पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो. कारण आपण हे जाणतो की, मरण पावलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही. कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना. म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका. आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मरण पावलेल्यातून जिवंत झालेले असे देवाला समर्पण करा आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा. तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, पण कृपेखाली आणले गेला आहात. मग काय? मग आपण नियमशास्त्राखाली नसून कृपेखाली आणले गेलो आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? कधीच नाही. तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहात. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्त्वासाठी आज्ञापालनाचे, हे तुम्ही जाणत नाही काय? पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या. आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्त्वाचे दास झाला. मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्त्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा. कारण तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा तुम्ही नीतिमत्त्वाच्या बाबतीत स्वतंत्र होता. आता तुम्हास ज्यांची लाज वाटते त्या गोष्टींपासून तेव्हा तुम्हास काय फळ मिळत होते? कारण त्या गोष्टींचा शेवट मरण आहे. पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.
रोमकरांस पत्र 6:5-23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर आपण त्यांच्या मरणामध्ये त्यांच्याशी अशा रीतीने संयुक्त झालो, तर त्यांच्या पुनरुत्थानामध्येही त्यांच्याशी खात्रीने संयुक्त होऊ. आपल्याला माहीत आहे की आपला जुना स्वभाव त्यांच्याबरोबरच खिळला गेला व पापाच्या अधिकारात असलेले आपले शरीर निर्बल झाले म्हणून यापुढे आपण पापाचे गुलाम असू नये. कारण जो कोणी मरण पावला आहे, तो पापापासून मुक्त झाला आहे. आता जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो, तर त्यांच्याबरोबर जिवंतही होऊ असा आपला विश्वास आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे की, ख्रिस्त मरणातून उठविले गेले ते पुन्हा मरू शकत नाही; यापुढे त्यांच्यावर मरणाची सत्ता चालणार नाही. त्यांचे हे मरण पापासाठी एकदाच मरण होते; पण आता जे जीवन ते जगतात, ते परमेश्वराकरिता जगतात. याप्रमाणे, आपण पापाला मरण पावलेले आणि ख्रिस्त येशूंद्वारे परमेश्वरासाठी जिवंत झालेले असे माना. तुम्ही वाईट वासनांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून तुमच्या मर्त्य शरीरावर पापाची सत्ता गाजवू देऊ नका. तुमच्या शरीराचा कोणताही अवयव पाप करण्यासाठी दुष्टपणाचे साधन म्हणून सादर करू नका, परंतु त्याऐवजी मरणातून जिवंत झाल्यासारखे परमेश्वराला सादर करा; आणि आपला प्रत्येक अवयव नीतिमत्वाची साधने होण्याकरिता त्याला सादर करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून येथून पुढे पाप तुम्हावर स्वामित्व चालविणार नाही. तर मग काय? आपण नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेच्या अधीन आहो, म्हणून आपण पाप करावे काय? नक्कीच नाही! ज्याची आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही स्वतःला वाहवून घेता, त्याची आज्ञा पाळण्याने तुम्ही त्याचे गुलाम बनता; पापाची गुलामी तर मरण, किंवा परमेश्वराचे आज्ञापालन तर नीतिमत्व हे तुम्हाला माहीत नाही काय? परमेश्वराचे आभारी आहोत, कारण पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, परंतु आता तुम्हाला जी शिकवण दिली आहे तिचे तुम्ही अंतःकरणापासून आज्ञापालन केले आणि तुम्ही समर्पित आहात. तुम्ही पापापासून मुक्त होऊन आता नीतिमत्वाचे दास झाला आहात. तुमच्या मानवी रीतिप्रमाणे रोजच्या जीवनातील उदाहरण घेऊन मी बोलतो. तुम्ही आपले अवयव अशुद्धपणाला व सतत वाढणार्या दुष्टपणाला दास म्हणून समर्पित केले होते, तसे आता स्वतःस जे नीतिमत्व पावित्र्याकडे नेते त्यास दास म्हणून समर्पित करा. जेव्हा तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा नीतिमत्वाच्या बंधनातून मुक्त होता. ज्यासाठी तुम्हाला आता लाज वाटते त्या गोष्टींपासून त्यावेळी तुम्हाला काय लाभ मिळाला? त्या गोष्टींचा परिणाम तर मरण आहे. पण आता तुम्ही पापाच्या सत्तेपासून मुक्त झाला असून परमेश्वराचे दास झाला आहात, आणि जो लाभ तुम्हाला मिळाला आहे तो पावित्र्याकडे नेतो व त्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
रोमकरांस पत्र 6:5-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही; त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारे स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना. ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये; आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो. तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे; कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळपण व स्वैराचार ह्यांस गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्त्वाला गुलाम असे समर्पण करा. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्त्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हांला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
रोमकरांस पत्र 6:5-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण आपण जर त्याच्या अशा मरणात त्याच्याशी जोडले गेलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानानेही निश्चितपणे त्याच्याशी जोडले जाऊ. हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाची गुलामी पत्करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रुसावर खिळला गेला; कारण जो कोणी मरण पावतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान ठरतो. परंतु ख्रिस्ताबरोबर मरण पावल्यामुळे त्याच्याबरोबर आपण जिवंतही राहू, असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही आणि तो पापाला एकदाच मरण पावला असल्यामुळे मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालत नाही. आता तो जगतो, तो देवासाठी जगतो. तर मग तसे तुम्हीही स्वतःस ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना. म्हणून तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन होऊ नये ह्यासाठी पापाने तुमच्या मर्त्य शरीरावर राज्य करू नये. तुम्ही यापुढे तुमचे अवयव दुष्टपणाची साधने म्हणून वापरू नका, परंतु तुमचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून देवाला अर्पण करा कारण तुम्हाला मरणातून जीवनाकडे आणण्यात आले आहे. तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीत, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पापाने तुमच्यावर सत्ता चालविता कामा नये. तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात,हे तुम्हांला ठाऊक नाही काय? ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे तुम्ही गुलाम आहात किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात? तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारची शिकवण तुम्ही स्वीकारली आहे, तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाला धन्यवाद! तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. जसे तुम्ही आपले अवयव अमंगळपण व स्वैराचार करण्याकरिता वापरले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्वाला गुलाम म्हणून समर्पित करा. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त झाले? त्यांचा शेवट तर मरण आहे! परंतु आता तुम्ही पापांपासून मुक्त झाल्यामुळे तुम्ही देवाचे गुलाम आहात. ह्याचा फायदा म्हणजे तुम्ही पवित्र होता. त्याची परिणीती शाश्वत जीवनात होते. पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शाश्वत जीवन आहे.