YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 5:12-19

रोमकरांस पत्र 5:12-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यांवर मरण आले. करण नियमशास्त्रापुर्वी जगात पाप होते, पण नियमशास्त्र नसतेवेळी पाप हिशोबात येत नाही. तरी मरणाने आदामापासून मोशेपर्यंत राज्य केले; आदामाच्या उल्लंघनाच्या रूपाप्रमाणे ज्यांनी पाप केले नव्हते त्यांच्यावरही राज्य केले आणि तो तर जो पुढे येणार होता त्याचा नमुना होता. पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही; कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्कळ मरण पावले, तर त्याहून अधिक हे आहे की, देवाची कृपा व येशू ख्रिस्त या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कळांसाठी विपुल झाली. आणि पाप करणार्‍या एकामुळे जसा परिणाम झाला, तशी देणगीची गोष्ट नाही; कारण एका अपराधामुळे दंडाज्ञेसाठी न्याय आला, पण अनेक अपराधांमुळे निर्दोषीकरणासाठी कृपादान आले. कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्त्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले. कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरवले गेले, तसे एकाच्या आज्ञापालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले जातील.

रोमकरांस पत्र 5:12-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण जगात आले; सर्व लोकांमध्ये मरण पसरले, कारण सर्वांनी पाप केले आहे. नियमशास्त्र देण्यापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र अस्तित्वात नसल्यामुळे, कोणालाही पापाबद्दल दोषी ठरविता येत नव्हते. आदामापासून मोशेपर्यंत मृत्यूचे राज्य होते, कारण आदामासारखा आज्ञेचा भंग त्यांनी स्वतः कधीही केलेला नव्हता. आदाम, जो येणार होता त्याचे प्रतिरूप होता. तरी देणगी ही आज्ञाभंगासारखी नाही. कारण या एका मनुष्याने, म्हणजे आदामाने, आपल्या पापांमुळे अनेक मानवांवर मृत्यू आणला. परंतु परमेश्वराची कृपा व देणगी एका मनुष्याद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे अनेकांना प्राप्त झाली. परमेश्वराचे वरदान एका मनुष्याने केलेल्या पापाच्या परिणामासारखे नाही आणि एकाच्या पापामुळे न्याय दंड मिळाला, परंतु वरदान अनेक अपराधानंतर आले आणि आपल्याला नीतिमान गणण्यात आले. कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे, त्याच मनुष्याच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर ज्यांना कृपेची व नीतिमत्वाची विपुल दाने मिळाली आहेत, ते येशू ख्रिस्त जे एक मानव आहेत, त्यांच्याद्वारे जीवनात किती विशेषकरून राज्य करतील! यास्तव एका अपराधामुळे सर्व मनुष्यजाती दंडास पात्र झाली, तसेच न्यायीपणाच्या एका कृत्यामुळे सर्व मनुष्यजात जीवनासाठी नीतिमान ठरविली जाते. कारण जसे एक मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे अनेक लोक पापी ठरविले गेले, तसेच एका मनुष्याच्या आज्ञापालनामुळे अनेक लोक नीतिमान ठरविले जातील.

रोमकरांस पत्र 5:12-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि, आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले; आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही; कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरता विशेषेकरून विपुल झाली. आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही; कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्त्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषेकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.

रोमकरांस पत्र 5:12-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

एका माणसाद्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण शिरले. सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होते, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि, आदामपासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामच्या उ्रंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही मरणाने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता फारच अधिक प्रमाणात विपुल झाली आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही, कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. परंतु कृपादानामुळे सर्व निर्दोषी ठरवले जातात. जर त्या एकाच माणसाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेच्या व नीतिमत्त्वाच्या दानाची विपुलता स्वीकारतात, ते कितीतरी अधिक प्रमाणात येशू ख्रिस्त या एका माणसाद्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एका अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे एका माणसाच्या नीतिमत्त्वाच्या कृत्यामुळे सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे एका माणसाच्या आज्ञापालनाद्वारे पुष्कळ जण नीतिमान ठरविले जातील.