YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 4:1-12

रोमकरांस पत्र 4:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणावे? कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्यास अभिमान मिरवण्यास कारण होते; पण देवापुढे नाही. कारण शास्त्रलेख काय म्हणतो? अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले. आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते. पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार्‍यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणला जातो, देव ज्याच्या बाजूकडे कर्मांशिवाय नीतिमत्त्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो; तो असे म्हणतो की, ‘ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत. ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’ मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरता आहे की, सुंता न झालेल्यांकरताही आहे? कारण आपण असे मानतो की, विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता. मग तो कसा गणला गेला? त्याची सुंता झाल्यानंतर किंवा सुंता होण्याअगोदर? सुंता झाल्यानंतर नाही, पण सुंता होण्याअगोदर. आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्यास मिळालेल्या नीतिमत्त्वाचा शिक्का म्हणून त्यास सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्त्व गणले जावे. आणि जे सुंता झालेले आहेत ते केवळ सुंता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राहाम हा सुंता न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासास अनुसरुन जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे.

रोमकरांस पत्र 4:1-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आपण याबाबतीत काय म्हणावे, शारीरिक दृष्टीने जो आपला पूर्वज अब्राहाम याला काय अनुभवयास मिळाले? अब्राहाम जर कृत्यांमुळे नीतिमान ठरला असता तर त्याला बढाई मिरवण्यास काही कारण असते; परंतु परमेश्वरासमोर नाही. शास्त्रलेख काय म्हणतो? “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.” आता जो परिश्रम करतो त्याची मजुरी त्याचे दान नसून त्याचा अधिकार आहे. जो व्यक्ती परिश्रम करीत नाही, परंतु जो अधर्मी लोकांना नीतिमान ठरवणार्‍या त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती विश्वासाने नीतिमान ठरतो. दावीद राजा पण तेच सांगतो की कर्मावाचून परमेश्वर त्यांना नीतिमान म्हणून जाहीर करतो, त्यांच्या धन्यतेचा आनंद काय वर्णावा: “धन्य ते आहेत, ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे, व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे. धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशेबी प्रभू पापाचा दोष लावीत नाही.” हा आशीर्वाद केवळ सुंता झालेल्यांसाठी आहे की सुंता न झालेल्यांसाठी सुद्धा आहे? आपण असे म्हणतो की अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमत्व असे गणण्यात आला. कोणत्या परिस्थितीत त्याला मान्यता देण्यात आली? सुंता होण्यापूर्वी किंवा नंतर? नंतर नाही, पण अगोदर! सुंता झालेली नसताना त्याच्या विश्वासामुळे नीतिमत्व प्राप्त होते याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण होती. जे विश्वास ठेवतात पण ज्यांची सुंता झाली नाही, त्या सर्वांचा अब्राहाम हा पिता झाल्यामुळे त्यांना नीतिमत्व प्राप्त व्हावे, आणि तो सुंता झालेल्याचाही पिता आहे, पण ज्यांची केवळ सुंताच झाली नाही तर जो विश्वास आपला पिता अब्राहाम याच्यामध्ये सुंता होण्यापूर्वी होता त्या विश्वासावर पाऊल ठेऊन चालतात त्यांचाही पिता आहे.

रोमकरांस पत्र 4:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे; तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” आता जो काम करतो त्याची मजुरी मेहेरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणार्‍यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्त्व असा गणण्यात येतो. ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्त्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो, ते असे : “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य. ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’ तर हे आशीर्वचन सुंता झालेल्यांना आहे किंवा सुंता न झालेल्यांनाही आहे? कारण ‘विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता,’ असे आपण म्हणतो. तो कसा गणण्यात आला? तो सुंता झालेला असताना किंवा सुंता न झालेला असताना? सुंता झालेला असताना नव्हे, तर सुंता न झालेला असताना, आणि तो ‘सुंता न झालेला असताना’ त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्त्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून ‘सुंता ही खूण’ त्याला मिळाली; ह्यासाठी की, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्त्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे. आणि त्याने सुंता झालेल्या लोकांचाही बाप व्हावे, पण केवळ ते सुंता झालेले आहेत म्हणून नव्हे तर आपला पिता अब्राहाम सुंता न झालेला असता त्याचा जो विश्वास होता, त्यालाही अनुसरून चालतात म्हणून त्यांचा बाप व्हावे.

रोमकरांस पत्र 4:1-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याने ऐहिक दृष्टीने काय कमावले असे म्हणावे? अब्राहाम कृत्यांनी नीतिमान ठरला असला, तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे. परंतु देवासमोर नाही. धर्मशास्त्र काय सांगते? ‘अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान असे गणण्यात आले’. आता जो काम करतो, त्याची मजुरी दान नव्हे तर हक्काची अशी गणली जाते. अधार्मिकाला नीतिमान ठरवणाऱ्या देवावर जो विश्वास ठेवतो पण सकृत्ये करीत नाही, त्याला त्याच्या विश्वासामुळे नीतिमान गणण्यात येते. ह्याप्रमाणे ज्या माणसाला देव कृत्यांवाचून नीतिमान गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदसुद्धा करतो, ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले गेले आहे, ते धन्य! ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य! तर मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरिता घोषित करण्यात आलेला आहे किंवा सुंता न झालेल्यांकरिताही आहे? आम्ही असे म्हणतो, “विश्वास हा अब्राहामसाठी नीतिमत्व असा गणण्यात आला होता”. हे कधी झाले? त्याची सुंता झालेली असताना किंवा नसताना? सुंता झालेली असताना नव्हे, तर सुंता न झालेली असताना. त्याला त्याच्या विश्वासामुळे जे नीतिमत्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण त्याला मिळाली. म्हणून, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने पूर्वज व्हावे. आणि त्याने सुंता झालेल्या लोकांचाही पूर्वज व्हावे, पण केवळ ते सुंता झालेले आहेत म्हणून नव्हे तर आपला पूर्वज अब्राहाम त्याची सुंता होण्यापूर्वी त्याचा जो विश्वास होता, त्याला अनुसरून ते चालतात म्हणून त्यांचाही त्याने बाप व्हावे.