YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 15:17-33

रोमकरांस पत्र 15:17-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून मला देवाविषयीच्या गोष्टींत, ख्रिस्त येशूच्या द्वारे अभिमानाला कारण आहे. कारण परराष्ट्रीयांना आज्ञांकित करावे म्हणून, ख्रिस्ताने माझ्याकडून घडवले नाही असे शब्दाने आणि कृतीने काही सांगायला मी धजणार नाही. चिन्हांच्या व अद्भूतांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने; अशाप्रकारे मी यरूशलेम शहरापासून सभोवताली इल्लूरिकम प्रांतापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे. पण दुसर्‍याच्या पायावर बांधणारा होऊ नये म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते, अशा ठिकाणी मी सुवार्ता सांगण्यास झटलो. म्हणजे, शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, ‘ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते ते लोक पाहतील, आणि ज्यांनी ऐकले नव्हते त्यांना समजेल.’ आणि म्हणून, तुमच्याकडे येण्यामध्ये मला पुष्कळ अडथळा आला. पण आता या भागात काही वाव न राहिल्यामुळे व तुमच्याकडे यावे अशी इतक्या पुष्कळ वर्षांपासून माझी उत्कंठा असल्यामुळे, मी स्पेन देशाकडे प्रवास करीन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी अशी आशा करतो की, मी तिकडे जाताना तुम्हास भेटेन आणि तुमच्यात आधी, थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिकडे पोहचते करावे. पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरूशलेम शहरास जात आहे. कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरूशलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी. हे खरोखर त्यांना बरे वाटले आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण त्यांच्या आत्मिक गोष्टींत जर परराष्ट्रीय भागीदार झाले आहेत, तर दैहिक गोष्टींत त्यांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मी हे पुरे केल्यावर हे पीक त्यांना शिक्का करून देऊन, तुमच्या बाजूकडून स्पेनला जाईन. आणि माझी खातरी आहे की, मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन. पण, मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकरिता व आत्म्याच्या प्रीती करिता, बंधूंनो, तुम्हास विनंती करतो की, माझ्या लढ्यात, तुम्ही माझ्याकरिता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथीदार व्हा; म्हणजे, यहूदीयात जे अवमान करणारे लोक आहेत त्यांच्या हातून माझी सुटका व्हावी आणि यरूशलेमसाठी जी माझी सेवा आहे ती तेथील पवित्र जनांस मान्य व्हावी; म्हणजे देवाच्या इच्छेने मी आनंदाने तुमच्याकडे यावे व तुमच्या सहवासात पुन्हा उत्तेजित व्हावे. आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

रोमकरांस पत्र 15:17-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यास्तव मी परमेश्वराची सेवा ख्रिस्त येशूंद्वारे केली त्याबद्दल मी अभिमान बाळगतो. गैरयहूदीयांनी परमेश्वराचे आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्द व कृतीने जे काही पूर्ण केले त्या व्यतिरिक्त मी इतर गोष्टीबद्दल बोलण्यास धजणार नाही. चिन्हे आणि झालेली अद्भुते पवित्र आत्म्याच्या शक्तीने झाली. अशा रीतीने मी यरुशलेमपासून तो इल्लूरिकमापर्यंत सर्वत्र ख्रिस्ताच्या शुभवार्तेची घोषणा पूर्णपणे केली आहे. जिथे ख्रिस्ताबद्दल अजून कळले नाही त्या ठिकाणी जाऊन शुभवार्तेचा प्रचार करावा हेच माझे ध्येय होते, यासाठी की मी इतरांनी बांधलेल्या पायावर रचू नये. यशायाह म्हणतो: “त्यासंबंधी ज्यांना पूर्वी कधी कोणीही सांगितले नाही, ते पाहतील व ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.” यामुळे तुम्हाकडे येण्यास मला अनेकदा अडखळण आले. पण आता या प्रांतामध्ये मला काही काम करावयाचे राहिले नाही, आणि इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तुमच्याकडे येण्यास मी तयार झालो आहे. कारण स्पेन देशाची सफर करण्याचा माझा मानस आहे. तिकडे जाताना आशा आहे की मी काही काळ तुमच्या सहवासात आनंदाने घालविल्यावर, तुम्ही मला पुन्हा वाटेस लावावे. आता मी यरुशलेमकडे परमेश्वराच्या लोकांची सेवा करण्यासाठी जात आहे. कारण पाहा, मासेदोनिया व अखया येथील लोकांनी यरुशलेममधील प्रभूच्या लोकांना साहाय्य व्हावे म्हणून वर्गणी गोळा केली आहे. हे त्यांनी अतिशय आनंदाने केले. आपण ॠणी आहोत असे त्यांना वाटते. गैरयहूदीयांना यहूदीयांद्वारे आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झाले आहेत, या अद्भुत आध्यात्मिक दानाची अंशतः फेड म्हणून हे भौतिक दान द्यावे, असे त्यांनी ठरविले. ही वर्गणी पोहोचवून त्यांचे हे काम पार पाडल्यानंतर आणि दान त्यांना मिळाल्याची खात्री झाल्यानंतर मी स्पेनकडे जाताना तुम्हाला येऊन भेटेन; आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या भरपूर आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला माहीत आहे. बंधूंनो व भगिनींनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि आत्म्याच्या प्रीतीद्वारे, मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्या संघर्षात सहभाग म्हणून परमेश्वराजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी. यहूदीयामधील जे विश्वासणारे नाहीत त्यांच्यापासून माझे रक्षण व्हावे आणि मी नेत असलेली वर्गणी यरुशलेम येथील प्रभूच्या लोकांनी स्वीकारावी म्हणून प्रार्थना करा. मी परमेश्वराच्या इच्छेने आनंदाने तुम्हाकडे येऊ शकेन आणि तुमच्या सहवासात ताजातवाना होऊ शकेन. आता शांतीचे परमेश्वर तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

रोमकरांस पत्र 15:17-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यावरून देवाच्या गोष्टींसंबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान वाटतो. ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो; ते हे की, यरुशलेमेपासून सभोवती इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे. आणि दुसर्‍याच्या पायावर बांधू नये म्हणून, ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर “त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील;” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. ह्यामुळे मला तुमच्याकडे येण्यास अनेक वेळा अडथळा झाला. परंतु आता ह्या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही, आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा आहे; म्हणून मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन (कारण तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही माझी तिकडे बोळवण कराल अशी मी आशा धरतो.) सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेमेस जातो. कारण यरुशलेमेतील पवित्र जनांतल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटले होते. त्यांना बरे वाटले होते खरे आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण जर परराष्ट्रीय त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींचे अंशभागी झाले आहेत, तर ऐहिक गोष्टींत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत. ह्यास्तव हे फळ म्हणून त्यांच्या पदरात टाकून झाले की तुमच्याकडील वाटेने मी स्पेन देशास जाईन; आणि जेव्हा मी तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या [सुवार्तेच्या]आशीर्वादाच्या परिपूर्णतेने भरलेला असा येईन हे मला ठाऊक आहे. बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती करतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा; ह्यासाठी की, यहूदीयात जे अवज्ञा करणारे आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी, अशी की, मी देवाच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्याबरोबर विश्रांती घ्यावी. आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

रोमकरांस पत्र 15:17-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

म्हणूनच ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या सेवेचा मी अभिमान बाळगू शकतो. यहुदीतरांनी आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या साहाय्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडविले, ते ते तुम्हांला सांगण्याचे धाडस मी करतो. अशा प्रकारे यरुशलेमपासून इल्लूरिकमपर्यंत मी ख्रिस्ताचे शुभवर्तमान पूर्णपणे घोषित केले आहे. दुसऱ्यांनी घातलेल्या पायावर बांधू नये म्हणून, ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नव्हे, तर त्याच्याविषयी ज्या लोकांना कोणी सांगितले नाही ते पाहतील, ज्यांनी त्याच्याविषयी ऐकले नाही ते समजतील, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे शुभवर्तमान सांगण्याची माझी महत्त्वाकांक्षा होती. ह्यामुळे मला तुमच्याकडे येण्यास अनेक वेळा अडथळा झाला. परंतु आता ह्या प्रांतात माझे कार्य संपले असल्यामुळे आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा असल्यामुळे, मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन. तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने मन काहीसे तृप्त झाल्यावर तुम्ही मला तिथे जायला साहाय्य कराल, अशी मी आशा धरतो. सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेम येथे जात आहे; कारण यरुशलेममधील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक साहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांनी स्वेच्छेने ठरवले आहे. हा निर्णय त्यांचा स्वतःचा होता. परंतु वस्तुतः त्यांना मदत करणे त्यांचे कर्तव्य होते; कारण जर यहुदीतर त्यांच्या आध्यात्मिक आशीर्वादात सहभागी झाले आहेत, तर ऐहिक गोष्टींत त्यांची सेवा करण्याचे बंधन त्यांच्यावर आहे. हे काम पूर्ण करून त्यांच्यासाठी जमा केलेला संपूर्ण निधी त्यांच्या पदरात टाकून झाला की, तुमच्याकडील मार्गाने मी स्पेन देशास जाईन. जेव्हा मी तुमच्याकडे येईन, तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन, हे मला ठाऊक आहे. बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याद्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती करतो की, माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर कळकळीने प्रार्थना करा. ह्यासाठी की, यहुदीयात जे श्रद्धाहीन आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमसाठी मी जे सेवाकार्य करतो, ते पवित्र जनांना मान्य व्हावे. म्हणजे मी परमेश्वराच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्या सहवासात ताजातवाना होईन. शांतिदाता परमेश्वर तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.