रोमकरांस पत्र 14:13-23
रोमकरांस पत्र 14:13-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये. मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे. पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस. म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका. कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे. कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्यांनी स्वीकृत केलेला होतो. तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या. अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे. मांस न खाणे किंवा द्राक्षरस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे. तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय. पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.
रोमकरांस पत्र 14:13-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव आपण यापुढे एकमेकांना दोषी ठरवू नये; तर असा निश्चय करावा की कोणी आपल्या बंधू किंवा भगिनीपुढे काही विघ्न किंवा अडखळण ठेवू नये. मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूंमध्ये माझी खात्री आहे, की कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही; तरी अमुक पदार्थ अशुद्ध आहे, असे समजणार्यासाठीच तो अशुद्ध आहे. तुझ्या बंधूला किंवा भगिनीला अन्नामुळे क्लेश झाले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्यासाठी ख्रिस्त मरण पावले त्यांचा नाश तुझ्या खाण्यामुळे करू नको. तुमच्या दृष्टीने जे चांगले ते तुम्हाला माहीत आहे, त्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रसंग आणू नका. परमेश्वराचे राज्य खाणे व पिणे यात नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे. कारण जो अशाप्रकारे ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला संतोष देणारा व मनुष्यांनी पारखलेला आहे. तर मग जेणेकरून शांती व परस्परांची वृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे. अन्नामुळे परमेश्वराच्या कामाचा नाश करू नका. सर्व अन्न शुद्धच आहे; परंतु जो व्यक्ती काहीही खाण्यामुळे इतरांना अडखळवितो त्याला ते वाईट आहे. मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे किंवा जे योग्य नाही असे काहीही करू नका की जेणेकरून तुझे बंधू व भगिनी पापात पडतील. तुझ्याठायी जो विश्वास आहे तो तू परमेश्वरासमक्ष आपणाजवळ ठेव. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी ज्याला स्वतःचा न्यायनिवाडा करावा लागत नाही तो धन्य, पण संशय धरून जो कोणी व्यक्ती मग तो पुरुष व स्त्री, खातो तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.
रोमकरांस पत्र 14:13-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याकरता आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये; तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये. मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खातरी आहे की, कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही; तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे, असे समजणार्याला तो निषिद्धच आहे. अन्नामुळे तुझ्या भावाला दुःख झाले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश तू आपल्या अन्नाने करू नकोस. म्हणून तुम्हांला जे उत्तम लाभले आहे त्याची निंदा होऊ नये. कारण खाणे व पिणे ह्यांत देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यांत ते आहे. कारण ह्या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे. तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणार्या गोष्टी ह्यांच्यामागे आपण लागावे. अन्नाकरता देवाचे कार्य ढासळून पाडू नकोस. सर्व पदार्थ शुद्ध आहेत; परंतु जो माणूस अडखळण होईल अशा रीतीने खातो, त्याला ते वाईट आहे. मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो [किंवा अडखळतो अथवा अशक्त होतो] ते न करणे हे चांगले. तुझ्या ठायी जो विश्वास आहे तो तू देवासमक्ष मनातल्या मनातच असू दे. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी जो स्वत:ला दोष लावत नाही तो धन्य. पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.
रोमकरांस पत्र 14:13-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये, तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे किंवा अडखळण होईल असे काही ठेवू नये. मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खातरी आहे की, कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही. अन्नामुळे तुझ्या भावाला दुखवले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश तू आपल्या अन्नाने करू नकोस. तुम्हांला जे चांगले मिळाले आहे, त्याची निंदा होऊ देऊ नका; कारण खाणे व पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे आणि अशा प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो, तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे. तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक ठरणाऱ्या गोष्टींच्या मागे आपण लागावयास हवे. अन्नाकरता देवाचे कार्य नष्ट करू नकोस. सर्व प्रकारचे अन्न खाता येईल परंतु जो माणूस दुसऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा रीतीने खातो, तो चूक करतो. मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे आणि ज्यामुळे तुझा भाऊ अडखळतो ते न करणे हे चांगले. ह्या बाबतीत तुझ्यामध्ये जो विश्वास आहे, तो तू देवासमक्ष स्वत:साठी ठेव. आपणाला जे काही योग्य वाटते ते केल्यामुळे त्याविषयी ज्याच्या मनात दोषभावना निर्माण होत नाही तो धन्य! पण शंका असूनही जो खातो तो दोषी ठरतो कारण त्याचे खाणे विश्वासाच्या आधारे होत नाही आणि जे काही विश्वासाच्या आधारे होत नाही, ते पाप आहे.