YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 11:25-36

रोमकरांस पत्र 11:25-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे. आणि सर्व इस्राएल अशाप्रकारे तारले जाईल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सियोनापासून उद्धारक येईल, आणि याकोबातून अभक्ती घालवील. आणि मी त्यांची पापे दूर करीन. तेव्हा माझा त्यांच्याबरोबर हा करार होईल.’ ते सुवार्तेच्या बाबतीत तुमच्यामुळे वैरी आहेत पण ते दैवी निवडीच्या बाबतीत पूर्वजांमुळे प्रिय आहेत. कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात. कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता पण आता इस्त्राएलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे. त्याचप्रमाणे आता तेही अवमान करीत आहेत; म्हणजे तुमच्यावरील दयेच्या द्वारे त्यांच्यावर दया केली जावी. कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे. अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत? असे नियमशास्त्रात लिहिले आहे; ‘कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? किंवा त्याचा सल्लागार कोण होता? किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल?’ कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्यास युगानुयुग गौरव असो. आमेन.

रोमकरांस पत्र 11:25-36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

प्रिय बंधूंनो व भगिनींनो, या रहस्याविषयी तुम्ही अजाण नसावे अशी माझी इच्छा आहे, यासाठी की तुम्ही बढाई मारू नये: गैरयहूदी लोकांची ठरलेली संख्या पूर्ण विश्वासात येईपर्यंत इस्राएली लोक काही प्रमाणात कठोर झाले आहेत, आणि याप्रकारे सर्व इस्राएलचे तारण होईल. याविषयी लिहिले आहे: “सीयोनातून तारणारा येईल; व तो याकोबाला सर्व अभक्तीपासून वळवेल. मी त्यांची पापे हरण करेन. आणि त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे.” शुभवार्तेच्या दृष्टिकोनातून पाहता, ते तुमचे शत्रू आहेत; निवडीच्या दृष्टिकोनातून पाहता पूर्वजांसाठी ते अजूनही परमेश्वराला प्रिय असेच आहेत. कारण परमेश्वराचे पाचारण व कृपादाने अपरिवर्तनीय असतात. एकेकाळी तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणारे नव्हता, आता यहूदीयांच्या अवज्ञेचा परिणाम म्हणून तुम्हाला दया मिळाली आहे, आता परमेश्वराची जी दया तुमच्यावर झाली त्याचा परिणाम म्हणून, जे आज्ञा उल्लंघन करणारे झाले, त्यांना आता दया प्राप्त होईल. कारण सर्वांवर दया करावी म्हणून परमेश्वराने त्या सर्वांना आज्ञा मोडणार्‍यांसोबत बांधले आहे. अहाहा, परमेश्वराचे गहन ज्ञान आणि बुद्धीची संपत्ती किती अगम्य आहे! त्यांचे न्याय गहन आहेत, त्यांचे मार्ग किती दुर्गम आहेत! “कारण प्रभूचे मन कोण जाणू शकेल? किंवा त्यांचा सल्लागार कोण आहे?” “परमेश्वराला कोणी कधी काही दिले की परमेश्वराने त्यांची परतफेड करावी?” कारण त्यांच्यापासून आणि त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासाठी सर्वगोष्टी आहेत. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो! आमेन.

रोमकरांस पत्र 11:25-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बंधुजनहो, तुम्ही आपणांला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशत: कोडगे झालेले आहेत; ह्या रीतीने सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल; शास्त्रात असे लिहिलेले आहे, “मुक्त करणारा सीयोनेतून येईल; तो याकोबापासून अभक्ती दूर करील;” “जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन, तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल.” सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत; परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत. कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुमच्यावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे. अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! “प्रभूचे मन कोणी ओळखले अथवा त्याचा मंत्री कोण होता?” “अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?” कारण सर्वकाही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.

रोमकरांस पत्र 11:25-36 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

बंधुजनहो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, यहुदीतरांचा भरणा पूर्ण होईपर्यंत इस्राएली लोक तात्पुरते दुराग्रहाने श्रद्धेपासून दुरावले आहेत. परंतु पुढे सर्व इस्त्राएली लोकांचे तारण होईल, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे: मुक्तिदाता सियोनमधून येईल, तो याकोबच्या वंशजांमधून सर्व दुष्टपणा दूर करील. मी त्यांची पापे दूर करतो, तेव्हा त्यांच्याबरोबरचा माझा हा करार आहे. शुभवर्तमानाचा स्वीकार न केल्यामुळे तुमच्यासाठी ते शत्रू आहेत. परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे ते देवाचे प्रियजन आहेत. देवाला पस्तावा होत नाही आणि तो कृपादान व पाचारण काढून परत घेत नाही. पूर्वी तुम्ही ग्रीक लोक देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला यहुदी लोकांच्या आज्ञाभंगांमुळे दया प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे तुमच्यावरील दयेमुळे त्यांनाही आता दया प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कैदेत ठेवले आहे. अहाहा, देवाच्या सुज्ञतेची व ज्ञानाची समृद्धी किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती अनाकलनीय आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? त्याचा स्रागार कोण झाला आहे? त्याला प्रथम देऊन त्याच्याकडून फेड करून घेईल असा कोण आहे? कारण सर्व काही त्याच्याकडून, त्याच्याचद्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ निर्माण करण्यात आले आहे. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.