प्रकटी 8:6-13
प्रकटी 8:6-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजवण्यास तयार झाले. पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले. समुद्रातील तिसरा भाग जिवंत प्राणी मरण पावले आणि तसेच तिसरा भाग जहाजांचा नाश झाला. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला; त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते. चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही. आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!
प्रकटी 8:6-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते, त्यांनी आपआपले कर्णे वाजविण्याची तयारी केली. पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नीचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सर्व हिरवे गवत जळून गेले. नंतर दुसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा एका मोठ्या जळत्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्राचा तिसरा हिस्सा रक्तमय झाला. समुद्रातील एकतृतीयांश जिवंत प्राणी मरण पावले आणि एकतृतीयांश जहाजे नष्ट झाली. मग तिसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला. त्या तार्याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले. चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशाविना आणि रात्रीचा एकतृतीयांश भाग अंधार झाला. मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडतांना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.”
प्रकटी 8:6-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजवण्यास सिद्ध झाले. पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर’ वृष्टी झाली; आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला; एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसर्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा ‘अग्नीने पेटलेल्या’ मोठ्या ‘डोंगरासारखे’ काहीतरी समुद्रात टाकले गेले; समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले; आणि समुद्रातील प्राण्यांपैकी एक तृतीयांश प्राणी मरण पावले; तसेच एक तृतीयांश तारवांचा नाश झाला. तिसर्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा ‘तारा आकाशातून खाली पडला.’ तो नद्यांच्या व झर्यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला; त्या तार्याचे नाव कडूदवणा; आणि पाण्याच्या एक तृतीयांशाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली; कारण ते कडू झाले होते. चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले. मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला; त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले : “जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्यांच्या होणार्या ध्वनीने पृथ्वीवर राहणार्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!”
प्रकटी 8:6-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजविण्यास सिद्ध झाले. पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली आणि एक तृतीयांश पृथ्वी जळून गेली. एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले. समुद्रातील प्राण्यांपैकी एक तृतीयांश प्राणी मरण पावले व एक तृतीयांश तारवांचा नाश झाला. मग तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा मशालीसारखा पेटलेला विशाल तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला. (त्या ताऱ्याचे नाव “कडुदवणा”) आणि पाण्याचा एक तृतीयांश भाग कडुदवणा झाला, त्या पाण्याने पुष्कळ माणसे मेली कारण ते पाणी कडू झाले होते. त्यानंतर चौथ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व ताऱ्यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यामुळे त्यांच्या प्रकाशाचे एक तृतीयांश तेज कमी झाले आणि एक तृतीयांश दिवसाचा तसेच एक तृतीयांश रात्रीचाही प्रकाश नाहीसा झाला. मी पाहिले तेव्हा एक गरूड अंतराळात उंच उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, “इतर तीन देवदूत कर्णा वाजविणार आहेत, तेव्हा त्यांच्या कर्ण्यांच्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर किती अनर्थ, अनर्थ, अनर्थ ओढवणार आहे!”