प्रकटी 5:8-14
प्रकटी 5:8-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना होत्या. आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून देवासाठी माणसे विकत घेतली आहेत. तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.” मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती. देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले. जो वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे. प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!” चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.
प्रकटी 5:8-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोकर्याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांनी कोकर्याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एक एक वीणा आणि सोन्याची धूपपात्रे होती. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत. ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द हे असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंशातून, भाषेतून, आणि राष्ट्रातून लोक विकत घेतले, तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहेस; ते पृथ्वीवर राज्य करतील.” तेव्हा मी पाहिले हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांचे गीत ऐकू आले. ते राजासन, सजिव प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती उभे होते. ते मोठ्याने म्हणत होत: “ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!” मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते: “जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्याला उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुग असो!” तेव्हा ते चार सजीव प्राणी म्हणाले, “आमेन,” आणि त्या चोवीस वडीलजनांनी साष्टांग नमस्कार घालून आराधना केली.
प्रकटी 5:8-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील कोकर्याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या; त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या ‘प्रार्थना’ होत. ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यांना ‘राज्य’ व ‘याजक’ असे केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.” तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्याभोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली; आणि त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्रे होती.’ ते मोठ्याने म्हणत होते : “वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान गौरव व धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे!” आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो, आणि त्यांतील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे म्हणताना ऐकले : “राजासनावर बसलेला ह्याला व कोकर्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत!” तेव्हा ते चार प्राणी म्हणाले, “आमेन!” आणि चोवीस वडिलांनी [जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला] पाया पडून नमन केले.
प्रकटी 5:8-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडीलजन कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गात होते: “तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास पात्र आहेस, कारण तुझा वध करण्यात आला होता व तुझ्या बलिदानात्मक मृत्यूने तू सर्व वंश, भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे देवासाठी विकत घेतली आहेत आणि आमच्या देवासाठी ह्या प्रजेला तू राज्य व याजक असे केले आहे आणि हे लोक पृथ्वीवर राज्य करतील.” तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडीलजन ह्यांच्याभोवती हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांची वाणी ऐकू आली. ते उच्च स्वरात गात होते, “वधलेले कोकरू सामर्थ्य, धन, सुज्ञता, पराक्रम, सन्मान, गौरव व धन्यवाद हे स्वीकारण्यास पात्र आहे!” स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रामध्ये जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे गाताना ऐकले, “राजासनावर बसलेल्याला व कोकराला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम युगानुयुगे असो!” तेव्हा ते चार प्राणी म्हणाले, “आमेन!” आणि वडीलजनांनी लोटांगण घालून आराधना केली.