प्रकटी 22:1-3
प्रकटी 22:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते प्रत्येक महिन्यास आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात, त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही; त्याच्यामध्ये देवाचे व त्याच्या कोकऱ्याचे राजासन राहिल. त्याचे दास त्याची सेवा करतील.
प्रकटी 22:1-3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखवली. तिचे पाणी स्फटिकासारखे नितळ होते. परमेश्वर आणि कोकरा यांच्या राजासनांतून ती निघाली होती. मुख्य मार्गाच्या मध्यावरून ती वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनदायी वृक्ष उभे होते, त्यांना वर्षातून बारा वेळा बहर येई. प्रत्येक महिन्याला त्यांना नवी फळे येत. त्यांची पाने राष्ट्रांना निरोगी करण्यासाठी औषध म्हणून वापरली जात. तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील.
प्रकटी 22:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर त्याने देवाच्या व कोकर्याच्या राजासनातून ‘निघालेली’ नगरीच्या मार्गावरून वाहणारी ‘जीवनाच्या पाण्याची’ स्फटिकासारखी नितळ ‘नदी’ मला दाखवली. नदीच्या ‘दोन्ही बाजूंना’ बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते ‘दर महिन्यास आपली फळे’ देते आणि त्या झाडाची ‘पाने’ राष्ट्रांच्या ‘आरोग्यासाठी’ उपयोगी पडतात. ‘पुढे काहीही शापित असणार नाही;’ तर तिच्यामध्ये देवाचे व कोकर्याचे राजासन असेल; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील.
प्रकटी 22:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर त्या देवदूताने देवाच्या व कोकराच्या राजासनाकडून निघालेली, नगरीच्या मार्गावरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूंस वर्षातून बारा वेळा फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्यास फळे देते, आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. तिथे काहीही शापग्रस्त असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकराचे राजासन असेल आणि त्याचे सेवक त्याची उपासना करतील.