प्रकटी 22:1-21
प्रकटी 22:1-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते प्रत्येक महिन्यास आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात, त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही; त्याच्यामध्ये देवाचे व त्याच्या कोकऱ्याचे राजासन राहिल. त्याचे दास त्याची सेवा करतील. आणि ते त्याचे मुख पाहतील व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल. त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही; कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांच्यावर पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील. नंतर देवदूत मला म्हणाला, “हे शब्द विश्वासयोग्य आणि खरे आहेत. संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू आहे, त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या दासांना कळवण्यासाठी आपला दूत पाठविला आहे.” “पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य! आहे.” ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो. परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करू नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक दास आहे. देवाला नमन कर.” नंतर देवदूत मला म्हणालाः “तू या संदेश वचनावर शिक्का मारून बंद करू नको; काळाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस; कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे. जो मनुष्य अनीतिमान आहे, तो अनीतिमान राहो, जो अमंगळ आहे, तो अमंगळ राहो. जो नीतिमान आहे तो नैतीक आचरण करीत राहो. जो पवित्र आहे, त्यास आणखी पवित्रपणाने चालू दे.” “पाहा, मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे, मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहेत. परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.” “तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.” आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो. या पुस्तकात भविष्यकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्यास मी गंभीरपणे सावधान करतोः जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणील; आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल. जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.” आमेन, ये प्रभू येशू, ये. प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो.
प्रकटी 22:1-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखवली. तिचे पाणी स्फटिकासारखे नितळ होते. परमेश्वर आणि कोकरा यांच्या राजासनांतून ती निघाली होती. मुख्य मार्गाच्या मध्यावरून ती वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनदायी वृक्ष उभे होते, त्यांना वर्षातून बारा वेळा बहर येई. प्रत्येक महिन्याला त्यांना नवी फळे येत. त्यांची पाने राष्ट्रांना निरोगी करण्यासाठी औषध म्हणून वापरली जात. तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील. ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल. तेथे रात्र असणार नाही, दिव्यांची किंवा सूर्याच्या प्रकाशाची तेथे गरज लागणार नाही, कारण प्रत्यक्ष प्रभू परमेश्वरच त्यांचा प्रकाश होतील, आणि ते युगानुयुग राज्य करतील. नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना अंतःस्फूर्ती देणारे प्रभू परमेश्वर यांनी, ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्यांच्या सेवकांना कळविण्यासाठी त्यांच्या दूताला पाठविले आहे.” “पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचने पाळतो तो धन्य.” मी, योहानाने या सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्या आणि ज्या देवदूताने मला त्या दाखवल्या, त्याला नमन करण्यासाठी मी त्याच्या पायांवर उपडा पडलो. परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. तू परमेश्वराची आराधना कर.” नंतर त्याने मला सांगितले, “या पुस्तकातील भविष्यकथनाचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. अनाचारी अधिक अनाचार करोत, दुष्ट अधिक दुष्ट बनोत, न्यायी लोक अधिक नीतिमान होवोत व जे पवित्र आहेत, ते पवित्रतेत अधिकाधिक दृढ होवोत.” “पाहा, मी लवकर येत आहे! माझे प्रतिफळ मी बरोबर घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार देईन. अल्फा व ओमेगा, म्हणजे पहिला व शेवटला, आदि व अंत मीच आहे. “आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य. नगराच्या बाहेर कुत्रे व जादूटोणा करणारे, जारकर्मी, खुनी, मूर्तिपूजक, ज्यांना लबाडी प्रिय आहे असे लबाडी करणारे सर्वजण राहतील. “तू हे सर्व मंडळ्यांना सांगावे म्हणून मी, येशूंनी, माझा दूत तुझ्याकडे साक्षीदार म्हणून पाठविला आहे. मी दावीदाचे मूळ व त्याचा वंश आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे.” आत्मा व वधू ही म्हणतात “ये!” हा शब्द ऐकणारा प्रत्येकजण म्हणो, “ये!” कोणाही तान्हेल्याने यावे आणि कसलेही मोल न देता जीवनाचे पाणी हवे तेवढे प्यावे. या पुस्तकातील संदेश ऐकणार्या प्रत्येकाला मी सावध करतो: या ग्रंथपटात जे लिहिले आहे त्यात कोणी भर घातली, तर परमेश्वर त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणेल. तसेच जो कोणी या भविष्यकथनच्या पुस्तकात वर्णन केलेल्या वचनांतून काही काढून टाकील, त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून परमेश्वर काढून टाकील. ज्याने या गोष्टी सांगितल्या आहेत, तो जाहीरपणे म्हणतो, “होय, मी लवकर येत आहे!” आमेन! हे प्रभू येशू, ये! आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांवर असो. आमेन.
प्रकटी 22:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर त्याने देवाच्या व कोकर्याच्या राजासनातून ‘निघालेली’ नगरीच्या मार्गावरून वाहणारी ‘जीवनाच्या पाण्याची’ स्फटिकासारखी नितळ ‘नदी’ मला दाखवली. नदीच्या ‘दोन्ही बाजूंना’ बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते ‘दर महिन्यास आपली फळे’ देते आणि त्या झाडाची ‘पाने’ राष्ट्रांच्या ‘आरोग्यासाठी’ उपयोगी पडतात. ‘पुढे काहीही शापित असणार नाही;’ तर तिच्यामध्ये देवाचे व कोकर्याचे राजासन असेल; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ‘ते त्याचे मुख पाहतील’ व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा ‘सूर्याच्या प्रकाशाची’ गरज नाही; कारण प्रभू देव त्यांच्यावर ‘प्रकाश पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’ नंतर तो मला म्हणाला, “ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत; आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा2 देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर ‘घडून आल्या पाहिजेत’ त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहे. ‘पाहा, मी लवकर येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणार्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.” पुन्हा तो मला म्हणाला, “ह्या ‘पुस्तकातील’ संदेशवचने ‘शिक्का मारून बंद करू नकोस;’ कारण ‘वेळ’ जवळ आली आहे. दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो; नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.” “‘पाहा, मी’ लवकर1 ‘येतो;’ आणि प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे.’ ‘मी’ अल्फा व ओमेगा म्हणजे ‘पहिला व शेवटला,’ आदी व अंत असा आहे. आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’ अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’2 ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. ह्या गोष्टींविषयी तुम्हांला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे.” आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो. ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणार्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील; ‘आणि’ जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही ‘काढून टाकील’ त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.3 ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये, प्रभू येशू, ये. प्रभू येशूची कृपा सर्व4 जनांबरोबर असो. आमेन.
प्रकटी 22:1-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर त्या देवदूताने देवाच्या व कोकराच्या राजासनाकडून निघालेली, नगरीच्या मार्गावरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूंस वर्षातून बारा वेळा फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्यास फळे देते, आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. तिथे काहीही शापग्रस्त असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकराचे राजासन असेल आणि त्याचे सेवक त्याची उपासना करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. तिथे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज भासणार नाही, कारण प्रभू देव त्यांचा प्रकाश असेल आणि ते युगानुयुगे राज्य करतील. नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना स्वतःचा पवित्र आत्मा देणारा देवप्रभू ह्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्याच्या सेवकांना कळविण्यासाठी त्याच्या दूताला पाठविले आहे.” येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे! ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य!” हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले, तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताची आराधना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो व त्याची आराधना करणार होतो. परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. तू, संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. देवाची आराधना कर!” पुढे तो म्हणाला, “ह्या पुस्तकातील संदेशवचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण हे सर्व घडण्याची वेळ जवळ आली आहे. दुराचारी माणूस दुराचार करो. गलिच्छ मनुष्य गलिच्छ राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो. सदाचारी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.” येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास मी वेतन घेऊन येईन. मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटचा, आदी व अंत आहे.” आपल्याला जीवनाच्या झाडावरील फळ खाण्याचा अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपले झगे स्वच्छ धुतात ते धन्य! विकृत जन, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, शब्दाने व कृतीने लबाडी करणारे सर्व लोक ह्या नगरीच्या बाहेर राहतील. तुमच्यासाठी ह्या गोष्टींविषयी घोषणा करण्याकरिता मी स्वतः येशूने माझ्या दूताला ख्रिस्तमंडळ्यांकडे पाठवले आहे. मी दावीदच्या घराण्याचे मूळ व वंशज आहे. मी तेजस्वी प्रभाततारा आहे. पवित्र आत्मा व वधू हेही म्हणतात, “ये.” हे ऐकणारा प्रत्येक जणदेखील म्हणो, “ये” आणि जो तहानलेला आहे व ज्याला हवे आहे त्याने यावे व जीवनाचे पाणी दान म्हणून स्वीकारावे. ह्या पुस्तकातील संदेशवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी योहान इशारा देऊन सांगतो की, जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. तसेच जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, “खरोखर. मी लवकर येत आहे.” आमेन. ये, प्रभू येशू, ये! प्रभू येशूची कृपा सर्वांबरोबर असो. आमेन.