YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 21:1-10

प्रकटी 21:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. आणि मी ती पवित्र नगरी, नवे यरूशलेम, देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती; आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.” तेव्हा राजासनावर बसलेला म्हणालाः “पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत.” आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.” मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, “इकडे ये, मी तुला वधू, कोकऱ्याची नवरी दाखवतो.” तेव्हा त्याने मला आत्म्याने एका मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरूशलेम देवाकडून स्वर्गातून खाली उतरतांना दाखवली.

सामायिक करा
प्रकटी 21 वाचा

प्रकटी 21:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर मी, “एक नवी पृथ्वी व एक नवे आकाश” पाहिले, कारण पहिले आकाश व पहिल्या पृथ्वीचे अस्तित्व राहिले नसून त्यात समुद्र अस्तित्वात नव्हते. तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजे पवित्र नगरी, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती. राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, “पाहा! परमेश्वराचे वसतिस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील. ‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत.” जे राजासनावर बसले होते ते म्हणाले, “मी सर्वकाही नवीन करीत आहे!” मग ते म्हणाले, “हे लिहून घे; कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत.” ते मला म्हणाले, “सर्वकाही पूर्ण झाले आहे! मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. तान्हेल्या सर्व लोकांना मी जीवनाच्या झर्‍याचे पाणी मोफत देईन. जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझी संतती होतील. परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड—अशा माणसांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.” मग शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या वाट्या ओतणार्‍या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे येऊन मला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला वधू—कोकर्‍याची पत्नी दाखवितो.” तेव्हा मी आत्म्याने संचारित झालो आणि मला एका उंच व विशाल अशा पर्वतशिखरावर नेण्यात आले. तिथून मी ती पवित्र नगरी म्हणजे यरुशलेम, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली.

सामायिक करा
प्रकटी 21 वाचा

प्रकटी 21:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्‍यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’ ‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.” तेव्हा ‘राजासनावर बसलेला’ म्हणाला, “‘पाहा, मी’ सर्व गोष्टी ‘नवीन करतो.”’ तो म्हणाला, “लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.” तो मला म्हणाला, “झाले! मी अल्फा व ओमेगा, म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ‘तान्हेल्याला जीवनाच्या’ झर्‍याचे ‘पाणी फुकट’ देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील; ‘मी त्याचा देव होईन, आणि तो माझा पुत्र होईल.’ परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.” नंतर शेवटल्या ‘सात पीडांनी’ भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला; तो म्हणाला, “ये, नवरी म्हणजे कोकर्‍याची स्त्री मी तुला दाखवतो.” तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने ‘मला’ मोठ्या ‘उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम’ देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली.

सामायिक करा
प्रकटी 21 वाचा

प्रकटी 21:1-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजेच पवित्र नगरी, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती. मी राजासनाकडून आलेली उच्च वाणी ऐकली. ती अशी: “पाहा, आता देवाचा मंडप मनुष्यांमध्ये आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील, तो त्यांचा देव होईल. तो त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नसेल. शोक, रडणे व वेदनाही नसेल. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.” तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, “पहा! मी सर्व गोष्टी नवीन करतो!” तो मला असेही म्हणाला, “लिही, कारण ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत.” तो पुढे म्हणाला, “झाले! मी पहिला व शेवटचा, प्रारंभ व अंत आहे. मी तान्हेल्याला जीवनाच्या झऱ्याचे पाणी विनामूल्य देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील, मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.” नंतर शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत आला व म्हणाला, “ये, वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो.” तेव्हा मी आत्म्याने प्रभावित झालो. त्याने मला अतिशय उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली.

सामायिक करा
प्रकटी 21 वाचा