प्रकटी 2:1-7
प्रकटी 2:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले. मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आणि तू थकला नाहीस. तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. म्हणून तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाइतांच्या दुष्ट कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
प्रकटी 2:1-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो, व जो सोन्याच्या सात समयांमध्ये चालतो, त्यांचे हे शब्द आहेत. तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मी पाहिला आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला माहीत आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे. माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे. परंतु तुझी जी पहिली प्रीती होती ती तू सोडली आहेस, याविषयी तुला दोष देणे मला भाग आहे. तुम्ही कसे पतन पावलात याची आठवण करा! पश्चात्ताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. जर तुम्ही पश्चात्ताप करणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन आणि तुमची समयी तिच्या स्थानापासून दूर करीन. पण एक गोष्ट तुमच्यात अनुकूल आहे: माझ्याप्रमाणेच तू देखील निकलाइतांच्या कृत्त्यांचा द्वेष करतोस. ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको, आत्मा मंडळयास काय म्हणतो, जो विजय मिळवितो, त्याला मी परमेश्वराच्या स्वर्गलोकात असलेल्या जीवनाच्या वृक्षाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
प्रकटी 2:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो, ‘तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत; तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केलीस; आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर; तू पश्चात्ताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन, आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. तरीपण तुझ्यात एक आहे की, तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस; मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला, ‘देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड’ आहे, ‘त्यावरचे’ फळ मी ‘खाण्यास देईन.’
प्रकटी 2:1-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
इफिस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो व जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो - तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची पारख केल्यामुळे ते खोटे आहेत, असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आहे आणि तू खचून गेला नाहीस. परंतु तू पहिल्याप्रमाणे माझ्यावर प्रीती करीत नाहीस, ह्याविषयी तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे. तू कुठून पतन पावला आहेस, ह्याचा विचार कर व पश्चात्ताप करून पहिल्याप्रमाणे वागू लाग. तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. तरीही तुझा एक चांगला गुण म्हणजे माझ्याप्रमाणे तूदेखील निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस. पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन.