प्रकटी 17:1-18
प्रकटी 17:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो. पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले आणि पृथ्वीवर राहणारे तिच्या जारकर्माच्या द्राक्षरसाने मस्त झाले.” तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले; आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावांनी भरलेला होता आणि त्यास सात डोकी व दहा शिंगे होती. त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे नेसून, सोन्याचा व मोलवान रत्नांचा, मोत्ये ह्यांचा साज घातला होता. तिच्या हातात, अमंगळ गोष्टींनी व व्यभिचाराने भरलेला एक सोन्याचा प्याला होता; तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची आई. आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला या स्त्रीचे आणि जो पशू तिला पाठीवर वाहतो, ज्याला सात डोकी आणि दहा शिंगे आहेत त्या पशूचे रहस्य सांगतो. आणि तू जो पशू बघितलास, जो होता आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील कारण तो होता, नाही आणि येणार आहे. इथे ज्ञानी मनाचे काम आहे. ती सात डोकी, ही ती स्त्री ज्यांवर बसली आहे. ते सात डोंगर आहेत; आणि सात राजे आहेत, पाच पडले आहेत, एक आहे आणि दुसरा अजून आलेला नाही; आणि तो आल्यावर त्यास फारच थोडा वेळ रहावे लागेल. आणि तो जो पशू होता आणि नाही, तो आठवा राजा आहे; तो सातांपासून झालेला आहे; आणि नाशात जात आहे. आणि तू बघितलीस ती दहा शिंगे दहा राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही; पण त्यांना त्या पशूबरोबर, एक घटका राजांसारखा अधिकार मिळतो. ते एकमताचे आहेत, ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशूला देतात. ते कोकऱ्याशी युद्ध करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत.” आणि तो मला म्हणतो, तू जे पाण्याचे प्रवाह बघत आहेस, ज्यांवर ती वेश्या बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. आणि तू बघितलीस ती दहा शिंगे आणि तो पशू त्या वेश्येचा द्वेष करतील. तिला ओसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील आणि तिला अग्नीत जाळतील. कारण त्यांनी एकमनाचे होऊन देवाची वचने पूर्ण होईपर्यंत, त्याची इच्छा पूर्ण करायला आपले राज्य पशूला द्यावे हे देवाने त्यांच्या मनात घातले आहे. आणि जी स्त्री तुला दिसली ती पृथ्वीच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे.
प्रकटी 17:1-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पीडांची वाटी ओतणार्या त्या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे आला व मला म्हणाला, “माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्येचा न्याय कसा होणार आहे ते दाखवेन. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.” नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली. त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे घातली होती आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक गूढ अर्थाचे होते: महान बाबिलोन, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची माता. मी बघितले की येशूंसाठी हुतात्मे झालेल्या पवित्र लोकांचे रक्त पिऊन ती झिंगली होती. अचंबित होऊन मी तिच्याकडे पाहत राहिलो. तेव्हा देवदूत मला म्हणाले: “तू एवढा आश्चर्यचकित का झालास? ती स्त्री कोण आहे आणि ज्या सात डोक्यांच्या आणि दहा शिंगांच्या पशूवर ती स्वार झाली आहे, तो पशू कोण आहे, याचे रहस्य मी तुला सांगतो. तो पशू जो तुम्ही पाहिला होता, जो होता, पण आता नाही. तरी लवकरच तो अथांग कूपातून वर येईल आणि सार्वकालिक विनाशाकडे जाईल. पृथ्वीवरील लोकांपैकी ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, ते सर्व लोक पशूला पाहून थक्क होतील. जो पूर्वी होता, आता नाही, पण पुन्हा परत येणार. “हे समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत त्यावर ती स्त्री बसते. त्याचप्रमाणे ती सात डोकी, सात राजांची प्रतिके आहेत. त्यापैकी पाच राजे आधी पतन पावले आहेत. सध्या सहावा राजा राज्य करीत आहे आणि सातवा अजून यावयाचा आहे; पण त्याची कारकीर्द अल्पकाळच टिकेल. जो पशू आधी होता, पण आता नाही, तो आठवा राजा असून, सातापैकी एक आहे, नंतर त्याचाही नाश होईल. “त्या पशूची दहा शिंगे म्हणजे दहा राजे असून, ते अजून सत्तेवर आलेले नाहीत. त्यांनीही या पशूबरोबर राज्य करावे, म्हणून त्यांना एका तासापुरती सत्ता देण्यात येईल. त्या सर्वांचा एकच उद्देश आहे, ते पशूला आपले सामर्थ्य व अधिकार बहाल करतील. ते सर्वजण मिळून कोकर्या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.” तेव्हा देवदूत मला म्हणाला, “ती वेश्या ज्यांच्यावर बसली आहे, ते जलप्रवाह म्हणजे प्रत्येक लोक, समुदाय, राष्ट्र व भाषा आहेत. तो पशू व जी दहा शिंगे तू पाहिली, ते वेश्येचा द्वेष करतात; ते तिच्यावर हल्ला करतील आणि तिला नग्न करून तिचे मांस खातील व तिला अग्नीने जाळून टाकतील. कारण परमेश्वर आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मनात एक योजना घालेल. आपले सर्व अधिकार परमेश्वराचे वचन पूर्ण होईपर्यंत त्या शेंदरी पशूला देण्याचे ते एकमताने आपसात ठरवतील. तुझ्या दृष्टान्तात तू पाहिलेली स्त्री, पृथ्वीच्या राजांवर सत्ता गाजवणार्या महानगरीचे दर्शक आहे.”
प्रकटी 17:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला; तो म्हणाला, “इकडे ये, म्हणजे ‘अनेक जलप्रवाहांवर’ बसलेल्या मोठ्या कलावंतिणीचा2 झालेला न्यायनिवाडा तुला दाखवतो; ‘तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले’ आणि ‘तिच्या’ जारकर्मरूपी ‘द्राक्षारसाने पृथ्वीवर’ राहणारे ‘मस्त झाले.”’ मग मी आत्म्याने संचरित झालो असताना त्याने मला रानात नेले; तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व ‘दहा शिंगे’ असलेल्या किरमिजी रंगाच्या ‘श्वापदावर’ बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती; आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्माच्या मळाने भरलेला ‘सोन्याचा प्याला’ होता; तिच्या कपाळावर “मोठी बाबेल, कलावंतिणींची1 व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले. देवदूताने मला म्हटले, “तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि सात डोकी व दहा शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद ह्यांचा गूढ अर्थ मी तुला सांगतो. जे ‘श्वापद’ तू पाहिले ते होते आणि नाही; ते ‘अथांग डोहातून वर येणार’ आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ‘ज्यांची’ नावे ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिली’ नाहीत अशा पृथ्वीवर राहणार्या लोकांना, ते श्वापद होते, नाही, तरी हजर आहे असे पाहून आश्चर्य वाटेल. येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. ती सात डोकी म्हणजे सात डोंगर आहेत; त्यांवर ती स्त्री बसली आहे. आणि ती डोकी म्हणजे सात राजे आहेत,2 त्यांपैकी पाच पडले आहेत, एक आहे आणि एक अद्याप आला नाही; तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल. जे श्वापद होते आणि नाही तेच आठवा राजा आहे; तो त्या सातांपासून झालेला आहे; आणि तो नाशाप्रत जाणार आहे. जी ‘दहा शिंगे’ तू पाहिलीस ‘ती दहा राजे आहेत,’ त्यांना अद्यापि राज्य मिळालेले नाही; तरी त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजांच्यासारखा अधिकार मिळतो. ते एकविचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. हे कोकर्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत.” आणखी तो मला म्हणाला, “जेथे कलावंतीण बसली आहे, तेथे ‘जे जलप्रवाह’ तू पाहिलेस, ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत. जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिलेस ते कलावंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील. त्यांनी एकविचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले. जी स्त्री तू पाहिलीस ती ‘पृथ्वीवरच्या राजांवर’ राज्य करणारी मोठी नगरी होय.”
प्रकटी 17:1-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यानंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन मला म्हणाला, “इकडे ये, कुप्रसिद्ध वेश्येचा म्हणजेच अनेक नद्यांजवळ वसलेल्या महान नगरीचा न्यायनिवाडा होणार आहे, तो मी तुला दाखवितो.” तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरूपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले. मग मी आत्म्याने प्रभावित झालो असताना, त्याने मला रानात नेले, तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती. आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर “महान बाबेल, वेश्यांची व पृथ्वीवरील विकृतीची आई”, हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. ती स्त्री पवित्र लोकांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले. देवदूताने मला विचारले, “तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि सात डोकी व दहा शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद ह्यांचा गूढ अर्थ मी तुला सांगतो. जे श्वापद तू पाहिले, ते अस्तित्वात होते परंतु आता नाही. ते अथांग विवरातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना, ते श्वापद पूर्वी होते, आता नाही तरीही पुन्हा अवतरले, असे पाहून आश्चर्य वाटेल. येथे सुज्ञता व समज यांची गरज आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत. त्यांवर ती स्त्री बसते. ती डोकी म्हणजे सात राजेदेखील आहेत, त्यांच्यापैकी पाच पडले आहेत, एक जिवंत आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर थोडाच वेळराहील. जे श्वापद पूर्वी होते आणि आता नाही, तेच आठवे आहे. परंतु ते ह्या सातांचे आहे आणि त्याचा नाश होणार आहे. जी दहा शिंगे तू पाहिलीस ती म्हणजे दहा राजे आहेत, त्यांना अद्यापि राज्य मिळाले नाही. परंतु त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजाचा अधिकार दिला जाईल. त्यांचे सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देण्यात त्यांच्यात ऐक्य आहे. ते कोकराबरोबर लढतील, परंतु कोकरू त्यांना जिंकील, कारण कोकरू प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे आहेत ते कोकराच्या बरोबर आहेत.” तो देवदूत मला आणखी म्हणाला, “जेथे वेश्या बसली आहे, तेथे जे जलप्रवाह तू पाहिलेस ते लोक, समुदाय, राष्ट्रे व भाषा बोलणारे असे आहेत. जी दहा शिंगे तू पाहिलीस ती व श्वापद वेश्येचा द्वेष करतील व तिला एकाकी व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील. त्यांनी एकविचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले. जी स्त्री तू पाहिलीस ती पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी होय.”