प्रकटी 16:1-7
प्रकटी 16:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी परमपवित्रस्थानातून एक मोठी वाणी ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा आणि देवाच्या रागाच्या या सात वाट्या पृथ्वीवर ओता.” मग पहिला देवदूत गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली आणि ज्या लोकांवर त्या पशूचे चिन्ह होते व जे त्याच्या मूर्तीला नमन करीत असत त्यांना अतिशय कुरूप आणि त्रासदायक फोड आले. नंतर, दुसऱ्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली आणि त्याचे मरण पावलेल्या मनुष्याच्या रक्तासारखे रक्त झाले आणि समुद्रात जगणारे सर्व जीव मरण पावले. तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झऱ्यांवर ओतली, “आणि त्यांचे रक्त झाले” आणि माझ्या कानी आले की, जलाशयांचा देवदूत म्हणाला, तू जो पवित्र आहेस आणि होतास तो तू नीतिमान आहेस, कारण तू असा न्याय केलास. कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त पाडले, आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलेस; कारण ते याच लायकीचे आहेत. वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की, हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत.
प्रकटी 16:1-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी सात देवदूतांना म्हणतांना ऐकली, “जा, परमेश्वराच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.” त्याप्रमाणे, पहिला देवदूत मंदिरातून निघाला. त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा ज्या लोकांवर पशूची खूण होती, व ज्यांनी त्याच्या मूर्तीला नमन केले होते अशा प्रत्येकाला कुरूप आणि क्लेशदायक फोडे आले. दुसर्या देवदूताने आपले वाटी समुद्रावर ओतली, तेव्हा समुद्राचे पाणी मेलेल्या माणसाच्या रक्तासारखे रक्तमय झाले, आणि त्यातील सर्व प्राणी मरण पावले. तिसर्या देवदूताने त्याची वाटी नद्यांवर आणि झर्यावर ओतले आणि ते रक्तमय झाले. मग मी जलांच्या देवदूताला जाहीर करताना ऐकले: “जे तुम्ही आहात, जे तुम्ही होता, ते तुम्ही, हे पवित्र प्रभू, हा न्यायनिवाडा करण्यास तुम्ही न्यायी आहात. कारण त्यांनी तुमच्या पवित्र जणांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त सांडले, आणि आता तुम्ही त्यांना रक्त प्यावयास लावले आहे, त्याला ते पात्र आहेत.” नंतर वेदीला असे म्हणताना मी ऐकले: “खरोखर, हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, तुमचे न्याय न्यायी व सत्य आहेत.”
प्रकटी 16:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर मी ‘मंदिरातून निघालेली एक’ मोठी ‘वाणी’ ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा, देवाच्या ‘क्रोधाच्या’ सात वाट्या ‘पृथ्वीवर ओता.”’ तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्या ‘लोकांना’ वाईट व ‘घाणेरडे फोड आले.’ दुसर्याने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा ‘समुद्र’ मृत माणसाच्या रक्तासारखा ‘रक्तमय झाला’ आणि ‘त्यातील’ सर्व प्राणी ‘मरून गेले.’ तिसर्याने आपली वाटी ‘नद्या’ व पाण्याचे झरे ह्यांत ओतली, ‘आणि त्यांचे रक्त झाले.’ तेव्हा मी जलांच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “हे प्रभू, ‘जो तू पवित्र आहेस, होतास व असणार’, त्या तू असा न्यायनिवाडा केलास म्हणून तू ‘न्यायी’ आहेस; कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.” नंतर मी वेदीला1 असे बोलताना ऐकले, “हो, ‘हे प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत!”
प्रकटी 16:1-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पुढे मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. ती त्या सात देवदूतांना म्हणाली जा, “देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता!” पहिल्या देवदूताने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीची आराधना करणाऱ्या लोकांना दुर्गंधी येणारे व वेदनादायक फोड आले. नंतर दुसऱ्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा समुद्र मृत माणसाच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि त्यातील सर्व प्राणीमात्र मरून गेले. तदनंतर तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे ह्यात ओतली आणि त्यांचे रक्त झाले. तेव्हा मी जलाच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “जो तू आहेस व होतास, तो तू पवित्र आहेस! तू असा न्यायनिवाडा केला म्हणून तू न्यायी आहेस! त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे रक्त पाडले आणि तू त्यांना रक्त प्यावयास लावले आहे. हीच त्यांची योग्यता आहे!” नंतर मी वेदीला असे उत्तर देताना ऐकले, “होय, हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझे निर्णय सत्य व न्याय्य आहेत.”