स्तोत्रसंहिता 91:1-16
स्तोत्रसंहिता 91:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील. मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.” कारण तो तुला पारध्याच्या पाशातून आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील. तो तुला आपल्या पंखानी झाकील, आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. रात्रीच्या दहशतीचे भय, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला, किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस. तुझ्या एका बाजूला हजार पडले, आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले, पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही. तू मात्र निरीक्षण करशील, आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस. तुमच्यावर वाईट मात करणार नाही. तुमच्या घराजवळ कोणतीही पिडा येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील अशासाठी की, तू घसरून दगडावर पडू नये. तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील; तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील. तो माझ्याशी निष्ठावान आहे, म्हणून मी त्यास सोडवीन; मी त्यास सुरक्षित ठेवीन कारण तो माझ्याशी प्रामाणिक आहे. जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन; मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन. मी त्यास दीर्घायुष्य देईन, आणि त्यास माझे तारण दाखवीन.
स्तोत्रसंहिता 91:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. मी याहवेहला म्हणेन, “तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत, माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे.” कारण ते पारध्याच्या पाशापासून आणि प्राणघातक मरीपासून तुझे रक्षण करतील. ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील, त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल; त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल. तुला अंधकाराच्या आतंकाचे भय वाटणार नाही, किंवा दिवसा सुटणार्या बाणांचेही नाही. अंधारात दबा धरून राहणार्या मरीचे, किंवा भर दुपारी येणार्या आपत्तीचेही भय वाटणार नाही. हजार लोक तुझ्याजवळ पडले, आणि दहा हजार तुझ्या उजव्या बाजूला पडले, तरी ती संकटे तुझ्या जवळदेखील येणार नाहीत. तू केवळ आपल्या दृष्टीने निरीक्षण करशील, आणि दुष्टांना केलेली शिक्षा बघशील. जर तू म्हणाला, “याहवेह माझे आश्रयस्थान आहेत,” आणि तू परमोच्चास आपले निवासस्थान केलेस, तर तुला कोणतीही इजा होणार नाही, किंवा कोणतेही अरिष्ट तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण ते आपल्या स्वर्गदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देतील, म्हणजे तू जाशील तिथे तुझे रक्षण व्हावे. ते तुला त्यांच्या हातांवर उचलून धरतील, म्हणजे तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये. तू सिंह आणि नागाला चिरडशील; भयंकर सिंहाला व सर्पाला तू आपल्या पायाखाली तुडवशील. याहवेह म्हणतात, “तो मजवर प्रीती करतो, म्हणून मी त्याला सोडवेन, त्याचे रक्षण करेन, कारण त्याने माझा नामाधिकार मान्य केला आहे. तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन; त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन; मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन. दीर्घायुष्य देऊन मी त्याला तृप्त करेन, आणि त्याला माझ्या तारणाचा अनुभव घडवेन.”
स्तोत्रसंहिता 91:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी “माझा आश्रय, माझा दुर्ग” असे म्हणतो; “तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो.” कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही; मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील; तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन; त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.