स्तोत्रसंहिता 9:1-12
स्तोत्रसंहिता 9:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन; तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन. मी तुझ्या ठायी हर्ष व उल्लास पावेन; हे परात्परा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन. माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात; कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस; तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस. तू राष्ट्रांना धमकावले आहेस; दुर्जनांचा तू नाश केला आहेस; तू त्यांचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस. वैर्यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे. परमेश्वर तर सर्वकाळ राजासनारूढ आहे; त्याने न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करील; तो लोकांना खरा न्याय देईल. परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे; ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस. सीयोननिवासी परमेश्वराचे स्तवन करा, त्याची कृत्ये राष्ट्राराष्ट्रांत विदित करा; कारण रक्तपाताचा सूड उगवणार्यास त्यांची आठवण आहे; तो दीनांचा आक्रोश विसरला नाही.
स्तोत्रसंहिता 9:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन; मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन. तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन. माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात. कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे. आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस; तू दुष्टाचा नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे. जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे. परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे. तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे. परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे, संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे. जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही. सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा. कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे. तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही.