स्तोत्रसंहिता 71:1-24
स्तोत्रसंहिता 71:1-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नको. मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव; तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर. मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस. हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव, अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव. कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे. गर्भापासून तूच माझा आधार आहेस; माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल. पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; तू माझा बळकट आश्रय आहे. माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने आणि सन्मानाने भरलेले असो. माझ्या वृद्धापकाळात मला दूर फेकून देऊ नको; जेव्हा माझी शक्ती कमी होईल तेव्हा मला सोडू नकोस. कारण माझे शत्रू माझ्याविरूद्ध बोलत आहेत; जे माझ्या जिवावर पाळत ठेवून आहेत ते एकत्रित येऊन कट करत आहेत. ते म्हणाले देवाने त्यास सोडले आहे; त्याचा पाठलाग करा आणि त्यास घ्या, कारण त्यास सोडवणारा कोणीही नाही. हे देवा, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस; माझ्या देवा, माझ्या मदतीला त्वरा कर! जे माझ्या जिवाचे विरोधी आहेत त्यांना लज्जित आणि नष्ट कर, जे माझे अनिष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धिक्काराने आणि मानहानीने झाकून टाक. पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन, आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन. माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे आणि तारणाविषयी सांगत राहील, जरी मला ते समजले नाही. प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन; मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन. हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे. खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे, तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत, हे देवा, मला सोडू नको. हे देवा, तुझे नितिमत्व खूप उंच आहे; हे देवा, ज्या तू महान गोष्टी केल्या आहेस, त्या तुझ्यासारखा कोण आहे? ज्या तू मला अनेक भयंकर संकटे दाखवली, तो तू मला पुन्हा जिवंत करशील; आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. तू माझा सन्मान वाढव; आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर. मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन. मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील. माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल; कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत.
स्तोत्रसंहिता 71:1-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह, मी केवळ तुमच्या ठायी आश्रय घेतला आहे; मला लज्जित होऊ देऊ नका. तुमच्या नीतिमत्वानुसार मला वाचवा आणि सोडवा; तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा आणि माझे तारण करा. मी सदैव जाऊ शकेन असे माझे आश्रयाचे खडक तुम्ही व्हा; तुम्ही माझ्या तारणाची आज्ञा द्या, कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात. परमेश्वरा, मला दुष्ट लोकांच्या पंजातून सोडवा, अन्यायी आणि क्रूर लोकांच्या तावडीतून मला मुक्त करा. प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात; तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे. जन्मापासूनच मी तुमच्यावर अवलंबून आहे; तुम्ही मला माझ्या आईच्या गर्भातून बाहेर आणले. मी सर्वकाळ तुमची स्तुती करेन. अनेक लोकांसाठी मी एक उदाहरण झालो आहे; तुम्ही माझे प्रबळ शरणस्थान आहात. माझे मुख तुमच्या स्तुतीने भरलेले असते, दिवसभर तुमच्या वैभवाची घोषणा करतो. माझ्या वृद्धावस्थेत माझा त्याग करू नका; माझी शक्ती म्लान होत असता मला सोडू नका. माझे शत्रू माझ्याविरुद्ध बोलतात; माझा जीव घेणारे एकत्र येऊन मसलत करतात. ते म्हणतात, “परमेश्वराने त्याचा त्याग केला आहे; त्याचा पाठलाग करून त्याला धरा, कारण त्याला कोणीही सोडविणारा नाही.” परमेश्वरा, माझ्यापासून दूर राहू नका, माझ्या परमेश्वरा, लवकर येऊन माझे साहाय्य करा. जे माझ्यावर आरोप लावतात ते लज्जित होऊन नष्ट होवोत; जे माझे वाईट करू इच्छितात त्यांना अपयश आणि अप्रतिष्ठा यांनी आच्छादून टाका. परंतु मी तर निरंतर आशा करीतच राहणार; मी तुमची अधिकाधिक स्तुती करेन. जरी मला त्यांचे वर्णन करण्याची क्षमता नाही तरी दिवसभर माझे मुख तुमच्या न्यायीपणाच्या— आणि तारणाच्या कृत्यांबद्दल घोषणा करेल. मी येईन आणि प्रभू याहवेहच्या महान कार्याची घोषणा करेन; मी तुमच्या, केवळ तुमच्याच, नीतियुक्त कृत्यांची घोषणा करेन. परमेश्वरा, तारुण्यापासून तुम्ही मला शिकवीत आलेले आहात, आणि आजपर्यंत मी तुमच्या अद्भुतकृत्यांना जाहीर करीत आहे. आता माझे केस पांढरे झालेले असताना आणि मी वयस्कर झालो असताना, परमेश्वरा, माझा त्याग करू नका; तुमच्या सर्व सामर्थ्याचे वर्णन नवीन पिढीला आणि त्यांच्या मुलांना देखील सांगण्यासाठी तुम्ही मला अवधी द्या. परमेश्वरा, तुमचे नीतिमत्व आकाशापर्यंत अत्यंत उंच आहे; तुम्ही केलेली कृत्ये अद्भुत आहेत, परमेश्वरा, तुमच्यासारखा दुसरा कोण आहे? असाध्य, असंख्य आणि अतितीव्र समस्या तुम्ही मला दाखविल्या आहेत, तरी तुम्ही मला नवजीवन द्याल, आणि पृथ्वीच्या गर्भातून तुम्ही मला पुन्हा वर काढाल. तुम्ही माझा सन्मान वाढवाल आणि माझ्याकडे वळून पुनः माझे सांत्वन कराल. माझ्या परमेश्वरा, मी सतारीवर तुमच्या विश्वासूपणाबद्दल तुमचे स्तवन करेन; हे इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरा, मी वीणेवर तुमची स्तुती गाईन. हर्षभराने माझे ओठ तुमचा जयजयकार करतील आणि तुम्ही माझा उद्धार केला म्हणून मी तुमची स्तुतिस्तोत्रे उच्चस्वराने गाईन. तुमच्या न्यायीपणाचे वर्णन माझी जीभ दिवसभर करेल, कारण मला अपाय करण्याची योजना करणारे सर्व लज्जित आणि अपमानित झाले आहेत.
स्तोत्रसंहिता 71:1-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर; माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर; मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो; माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस. कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस. हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर, अन्यायी व निर्दय ह्यांच्या तावडीतून मला मुक्त कर. कारण, हे प्रभू, परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस; माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. जन्मापासून तूच माझा आधार आहेस; मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस; मी तुझी स्तुती निरंतर करीन. पुष्कळ लोकांना मी आश्चर्याचा विषय झालो आहे; तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस. माझ्या मुखात तुझे स्तुतिस्तोत्र सदा राहो; त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत. उतारवयात माझा त्याग करू नकोस; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस. कारण माझे वैरी माझ्याविषयी बोलतात आणि माझ्या जिवावर टपणारे एकत्र मिळून मसलत करतात. ते म्हणतात, “देवाने ह्याला सोडले आहे; ह्याच्या पाठीस लागा, ह्याला धरा; कारण ह्याला सोडवणारा कोणी नाही.” हे देवा, माझ्यापासून दूर असू नकोस; हे माझ्या देवा, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर. माझ्या जिवाला अपाय करणारे लज्जित होऊन नष्ट होवोत; माझे अनिष्ट करू पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप्त होवोत. मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करत जाईन. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील; त्यांची संख्या मला कळत नाही. प्रभू परमेश्वराच्या महत्कृत्यांचे मी वर्णन करत येईन; तुझ्या, केवळ तुझ्याच, नीतिमत्त्वाचे मी निवेदन करीन. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णन केली आहेत. मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस. हे देवा, तुझे नीतिमत्त्व गगनापर्यंत पोहचले आहे. हे देवा, तू महत्कृत्ये केली आहेत; तुझ्यासारखा कोण आहे? तू मला अनेक भारी संकटे भोगायला लावलीस, तरी तू माझे पुनरुज्जीवन करशील, आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. तू माझे महत्त्व वाढव आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर. मी तर सतारीवर तुझे स्तुतिस्तोत्र गाईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्तोत्रे गाईन. मी तुझी स्तोत्रे गाताना माझे ओठ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील. माझी जीभही दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील; कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजीत झाले आहेत.