स्तोत्रसंहिता 7:1-17
स्तोत्रसंहिता 7:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव. नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील. वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील. परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, माझ्या हाती काही अन्याय नाही. माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही. किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही. जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो. हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा, माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने. राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो, आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे. परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो, परमेश्वरा, मला समर्थन दे, आणि माझ्या न्यायीपणाप्रमाणे आणि माझ्या स्वतःच्या सात्त्विकतेप्रमाणे माझा न्याय कर. दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे. जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे. देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो. जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार. त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत. तो आपले अग्नीबान तयार करतो. त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात. त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला. त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल. मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
स्तोत्रसंहिता 7:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमचा आश्रय घेतो; जे माझ्या पाठीस लागले आहेत, त्या सर्वांपासून माझे रक्षण करा आणि मला सोडवा. नाहीतर, सिंहाप्रमाणे ते मला फाडून टाकतील; मला सोडविण्यास कोणीही नाही म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी जर असे केले असेल, माझे हात सदोष असतील, जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल, माझ्या शत्रूला विनाकारण लुबाडले असेल— तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत; माझा जीव मातीत तुडवो आणि माझे गौरव धुळीस मिळवो. सेला हे याहवेह, आपल्या रागाने उठा; माझ्या शत्रूंच्या क्रोधाविरुद्ध उभे राहा; जागे व्हा आणि न्याय्य निर्णय द्या. उच्चस्थानी सिंहासनावर आरूढ असता, सर्व राष्ट्रांनी तुमच्याभोवती एकत्र जमावे. याहवेहच, सर्व मानवजातीचा न्याय करोत. माझ्या प्रामाणिकपणानुसार तुम्ही माझे समर्थन करा. हे सर्वोच्च परमेश्वरा! माझ्या धार्मिकतेनुसार माझा न्याय करा. दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा नीतिमानाला स्थिर करा— तुम्ही, हे नीतिमान परमेश्वरा, मने व अंतःकरणे पारखणारे परमेश्वर आहात. सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत, जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात. परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहेत, जे दुष्टाईचा सदैव तिरस्कार करतात. दुष्टांनी आपले मार्ग बदलले नाहीत, तर परमेश्वर आपली तलवार पाजळतील; आपले धनुष्य वाकवून त्याची दोरी ताणली आहे. मन त्यांनी आपली घातक शस्त्रे सज्ज केली आहेत; आपले अग्निबाण तयार ठेवले आहेत. जे दुष्टपणाचा वेणा देतात, ते उपद्रवाचे गर्भधारण करतात आणि फसवणुकीला जन्म देतात. जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात ते स्वतःच त्यांनी खणलेल्या खड्ड्यात पडतात. त्यांच्या दुष्टाईने त्यांनाच शासन होते; त्यांची हिंसा त्यांच्याच डोक्यावर येऊन बसते. याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन. परमोच्च याहवेहच्या नावाची मी स्तुतिस्तोत्रे गाईन.
स्तोत्रसंहिता 7:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे; माझ्या पाठीस लागणार्या सर्वांपासून माझे रक्षण कर, मला सोडव; नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील; मला सोडवणारा कोणी नाही म्हणून तो माझे तुकडेतुकडे करील. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल, माझ्याशी मिळूनमिसळून असणार्यांचे मी वाईट केले असेल, (उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैर्याला सोडवले आहे,) तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडवो, आणि माझा गौरव धुळीस मिळवो. (सेला) हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन ऊठ; माझे शत्रू संतापले असता त्यांच्याविरुद्ध उभा राहा; माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस; तुझ्याभोवती लोकांचा समुदाय गोळा होवो. तू त्यांच्यावर उच्च स्थानी आरूढ हो. परमेश्वर लोकांचा न्याय करतो; माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सात्त्विकतेप्रमाणे, हे परमेश्वरा, माझा न्याय कर. दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे. सरळ मनाच्यांना तारणार्या देवाने माझी ढाल धरली आहे. देव न्यायी न्यायाधीश आहे; तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे. कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्याविरुद्ध तो आपली तलवार पाजळतो, त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहे. त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत; त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत. पाहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो; उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो. त्याने खड्डा खणून खोल केला; आणि तोच त्या खड्ड्यात पडला. त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल; त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल. परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन; परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन.