स्तोत्रसंहिता 51:1-10
स्तोत्रसंहिता 51:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक. देवा माझे अपराध धुऊन टाक, आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर. कारण माझे अपराध मला माहित आहेत. आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत. तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे, आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो. तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो. पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे. मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन. आनंद व हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील. माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक. देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
स्तोत्रसंहिता 51:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा नि:स्पृह ठरशील. पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.