YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 42:1-9

स्तोत्रसंहिता 42:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? “तुझा देव कोठे आहे?” असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते. हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन. हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे, म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिस्हाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो. तुझ्या धबधब्यांच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावत आहे; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील; मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. देव जो माझा खडक त्याला मी म्हणेन, “तू मला का विसरलास? वैर्‍याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे?”

स्तोत्रसंहिता 42:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन? जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?” तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे. हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर, कसा मी त्या गर्दीला नेतृत्व करत देवाच्या घरात घेऊन जात असे, हे आठवून माझा जीव माझ्याठायी ओतला जात आहे. हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण त्याच्या उपस्थितीने होणाऱ्या तारणामुळे मी त्याची अजून स्तुती करीन. माझ्या देवा, माझ्याठायी माझा जीव निराश झाला आहे, म्हणून यार्देनच्या प्रदेशापासून, हर्मोनच्या डोंगराच्या तीन शिखरावरून आणि मिसहारच्या टेकडीवरून मी तुझे स्मरण करतो. तुझ्या धबधब्याच्या अवाजाने ओघ ओघाला हाक मारतो. तुझ्या सर्व लहरी आणि मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या आहेत. तरी परमेश्वर त्याची प्रेमदया दिवसा अज्ञापील, आणि रात्री त्याचे गीत, म्हणजे माझ्या जीवाच्या देवाला केलेली प्रार्थना माझ्यासोबत असेल. मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करू?

स्तोत्रसंहिता 42:1-9

स्तोत्रसंहिता 42:1-9 MARVBSIस्तोत्रसंहिता 42:1-9 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा