स्तोत्रसंहिता 39:1-13
स्तोत्रसंहिता 39:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी ठरवले “मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन, म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही.” मी स्तब्ध राहिलो, चांगले बोलण्यापासूनही मी आपले शब्द आवरले. आणि माझ्या वेदना आणखी वाईट तऱ्हेने वाढल्या. माझे हृदय तापले, जेव्हा मी या गोष्टींविषयी विचार करत होतो, तेव्हा ते अग्नीप्रमाणे पेटले. तेव्हा शेवटी मी बोललो. हे परमेश्वरा, माझ्या जीवनाचा अंत केव्हा आहे, आणि माझ्या आयुष्याचे दिवस किती आहेत हे मला कळू दे, मी किती क्षणभंगुर आहे ते मला दाखव. माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे. पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत. आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही. खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे. खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार. हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस! माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको. मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस. मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे. जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला) परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझ्याकडे कान लाव. माझे रडणे ऐक, कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे. तुझे माझ्यावरील टक लावून बघने फिरव, म्हणजे मी मरणाच्या आधी पुन्हा हर्षीत होईल.
स्तोत्रसंहिता 39:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी स्वतःशी म्हणालो, “मी आपले आचरण जपणार आणि माझी जीभ पापापासून जपणार; अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील, तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन.” म्हणून मी काही चांगलेही बोललो नाही, अगदी शांत राहिलो. पण माझा त्रास वाढतच गेला; माझ्या अंतःकरणातील घालमेल अधिकच वाढत गेली, मी मनन करत असताना, माझ्या अंतःकरणातील अग्नी तप्त होत होता; तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो: याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा आणि माझे किती दिवस बाकी आहेत हे मला दाखवून द्या; माझे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते मला कळू द्या. पाहा, तुम्ही माझे दिवस चार बोटे केले आहे; माझा जीवितकाल तुमच्या दृष्टीने केवळ एका क्षणाचाच आहे; प्रत्येकजण, अगदी निश्चिंत असणारे लोकसुद्धा केवळ एक श्वास आहेत. सेला निश्चितच प्रत्येकजण खरोखर सावलीप्रमाणेच जगतो; संपत्ती गोळा करण्याची त्याची सर्व धावपळ ही निरर्थकच, याचा उपभोग कोण घेईल हे त्याला ठाऊक नाही. तर प्रभू, मी आता कोणत्या गोष्टींची प्रतीक्षा करू? माझी सर्व आशा तुमच्या ठायी आहे. माझ्या पातकांपासून माझे रक्षण करा; मला मूर्खांच्या थट्टेचा विषय होऊ देऊ नका. मी शांत राहिलो; मी माझे तोंड उघडले नाही, कारण तुम्हीच हे केले आहे. तुमचा चाबूक माझ्यापासून दूर करा; तुमच्या हाताच्या प्रहाराने मी म्लान झालो आहे. तुम्ही मनुष्याला त्याच्या पापाबद्दल फटके मारून शिस्त लावता, त्याचे ऐश्वर्य कसर लागलेल्या वस्त्रांप्रमाणे निकृष्ट करता; निश्चितच मनुष्य खरोखर केवळ श्वासमात्र आहे. सेला “याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची आरोळी ऐका; माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करू नका. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे या पृथ्वीवर प्रवास करणारा मी एक परदेशीय आणि वाटसरू आहे. मी जाण्यापूर्वी, माझ्यावरची तुमची कडक नजर मजपासून फिरवा. जेणेकरून मी थोड्या काळासाठीच जीवनाचे सुख पुन्हा प्राप्त करू शकेन.”
स्तोत्रसंहिता 39:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी म्हणालो की, “मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन; माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.” मौन धरून मी गप्प राहिलो, बरेदेखील काही बोललो नाही, तरी माझ्या दु:खाने उचल खाल्ली. माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले; मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो; “हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे, व माझे आयुष्यमान किती आहे, हे मला समजू दे; म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. पाहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत; माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही; एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपच होय, हे खास. (सेला) खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठायी आहे. माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडव; मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नकोस. मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही, कारण हे तूच केले आहेस. तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर; तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे. तू मनुष्याला अनीतीबद्दल धमकावून शासन करतोस, तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विलयास नेतोस; खरोखर सर्व माणसे श्वासवत आहेत. (सेला) हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या धाव्याकडे कान लाव; माझे अश्रू पाहून उगा राहू नकोस; कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्यापुढे परदेशीय व उपरा आहे. मी येथून जाऊन नाहीसा होण्यापूर्वी आनंदित व्हावे म्हणून माझ्यावर असलेली तुझी क्रोधदृष्टी काढ.”