स्तोत्रसंहिता 34:8-15
स्तोत्रसंहिता 34:8-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य! परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणार्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणार्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा; व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर, वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.
स्तोत्रसंहिता 34:8-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो. जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही. तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही. मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन. सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे? तर वाईट बोलण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर. वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग. परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.