YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 32:1-11

स्तोत्रसंहिता 32:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत ते आशीर्वादित आहेस. परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे. मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या, ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली. कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे. तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले, आणि मी माझा अपराध लपवला नाही, मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन, आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस. याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत. तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील, विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला) परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन. म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही. त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.” वाईट लोकांस खूप दु:ख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे. अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा. अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.

स्तोत्रसंहिता 32:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

धन्य तो मनुष्य, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे. धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशेबी याहवेह पापाचा दोष लावत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही. मी गप्प राहिलो, तेव्हा संपूर्ण दिवस माझी हाडे माझ्या कण्हण्यामुळे जर्जर झाली. रात्रंदिवस तुमचा हात माझ्यावर भारी होता; उष्मकालच्या उष्णतेप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली होती. सेला नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली आणि माझे अपराध लपविले नाही. मी स्वतःशी म्हणालो, “मी याहवेहजवळ माझी पातके कबूल करेन.” तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या दोषाची क्षमा केली. सेला यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याने तुम्हाला पावण्याची संधी आहे तोपर्यंत तुमची प्रार्थना करावी; संकटे जलाच्या महापूरासारखी आली तरी त्यांना त्याचा स्पर्श होणार नाही. माझे आश्रयस्थान तुम्ही आहात; संकटात तुम्हीच माझे रक्षण करणार आणि मुक्ततेच्या गीतांनी तुम्ही मला वेढणार. सेलाह याहवेह म्हणतात, जो मार्ग तू अनुसरावा त्याचे मी तुला मार्गदर्शन व शिक्षण देईन; माझी प्रेमळ नजर तुजवर ठेऊन मी तुला बोध करेन. तुमची मनोवृत्ती घोड्यासारखी किंवा खेचरासारखी नसावी, ज्यांना काही समज नसते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी अंकुश आणि लगाम लागतो, अन्यथा ते आपल्याजवळ येणार नाहीत. दुर्जनांवर अनेक दुःखे येतात. परंतु जे याहवेहवर विश्वास ठेवतात, त्यांच्याभोवती त्यांच्या अक्षयप्रीतीचे वेष्टण असते. नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद आणि हर्ष करा; तुम्ही जे सरळ मनाचे आहात, ते आनंदाने आरोळ्या मारा.

स्तोत्रसंहिता 32:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य! ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य! मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली; कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता; उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. (सेला) मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही; “मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन” असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. (सेला) ह्यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी; जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील; मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. (सेला) मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीत. दुर्जनाला पुष्कळ दु:खे भोगावी लागतात; परमेश्वरावर भाव ठेवणार्‍यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा; अहो सरळ मनाचे जनहो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.