YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 31:9-20

स्तोत्रसंहिता 31:9-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु:खात आहे. माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे. कारण माझे आयुष्य दु:खात आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत. माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत, आणि माझी हाडे झिजली आहेत. माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे. मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे. कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे, प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे, ते माझ्याविरुध्द कट करत आहेत. परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो. माझे वेळ तुझ्या हातात आहे. मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव. तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे. तुझ्या प्रेमदयेत मला तार. परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो, दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो. खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत, जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात. जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस. त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील. हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील.

स्तोत्रसंहिता 31:9-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेह, मजवर दया करा, कारण मी संकटात आहे; माझे डोळे दुःखाने थकलेले आहेत; शोकाने माझा देह व माझा आत्मा ढासळला आहे. दुःखामुळे माझे आयुष्य व कण्हण्यामुळे माझी वर्षे कमी होत आहेत; पापांनी माझी शक्ती शोषून घेतली आहे; माझी हाडे झिजून गेली आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे शेजारी माझा तिरस्कार करतात आणि माझ्या जवळच्या मित्रांची मला भीती वाटते— जे मला रस्त्यावर पाहताच माझ्यापासून दूर पळून जातात. एखाद्या मृत मनुष्यासारखा माझा विसर पडला आहे; एखाद्या फुटलेल्या भांड्यासारखी माझी अवस्था झाली आहे. कारण अनेकांना कुजबुजतांना मी ऐकले आहे. “सर्व बाजूने दहशत आहे!” ते माझ्याविरुद्ध कट रचीत आहे आणि माझा जीव घेण्यासाठी ते तयार आहेत. परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे. मी म्हणालो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” माझे दिवस तुमच्याच हातात आहेत. माझ्या शत्रूंच्या हातातून, माझा पाठलाग करणार्‍यांपासून तुम्हीच मला सोडवा. तुमचा मुखप्रकाश तुमच्या दासावर पडू द्या; तुमच्या प्रेमदयेने माझे तारण करा. याहवेह, मला लज्जित होऊ देऊ नका, मी तुमचा धावा केला आहे; दुष्ट लोक लज्जित होवोत; ते अधोलोकात निःशब्द होवोत. त्यांचे असत्य बोलणारे ओठ शांत केले जावो. कारण ते अहंकाराने आणि तिरस्काराने प्रेरित होऊन नीतिमानाविरुद्ध गर्वाने बोलतात. तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे, जो तुम्ही तुमच्या भय धरणार्‍यांसाठी राखून ठेवला आहे, आणि जे लोक तुमच्या ठायी आश्रय घेतात त्यांच्यावर त्याचा सर्वांसमक्ष वर्षाव करता. आपल्या उपस्थितीच्या आश्रयस्थानी तुम्ही मनुष्यांच्या युक्तीपासून त्यांचे रक्षण करता; आपल्या मंडपात तुम्ही त्यांना शत्रूंच्या आरोप करणार्‍या जिभेपासून बचाव करता.

स्तोत्रसंहिता 31:9-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे; माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाली आहेत. कारण माझे आयुष्य शोकात, माझी वर्षे उसासे टाकण्यात गेली आहेत; माझ्या दुष्टाईने माझी शक्ती क्षीण झाली आहे, माझी हाडे जीर्ण झाली आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे माझी निंदानालस्ती होत आहे; माझ्या शेजार्‍यापाजार्‍यांत माझी फार निर्भर्त्सना होत आहे; माझ्या ओळखीपाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे; मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात. स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे. फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे. कारण पुष्कळांच्या तोंडून माझी बेअब्रू झालेली मी ऐकली आहे; पाहावे तिकडे भयच भय! माझ्याविरुद्ध मनसुबा करून त्यांनी माझा जीव घेण्याची योजना केली. हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे; मी म्हणतो, “तूच माझा देव आहेस.” माझे दिवस तुझ्या हाती आहेत; माझ्या वैर्‍यांच्या हातातून, माझ्या पाठीस लागणार्‍यांपासून मला सोडव. तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड; तू आपल्या वात्सल्याने मला तार. हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस; कारण मी तुझा धावा केला आहे; दुर्जन लज्जित होवोत, ते अधोलोकात निःशब्द राहोत. नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणार्‍यांची वाचा बंद पडो. तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्‍यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्‍यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस. तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवतोस; शब्दकलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस.