YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 25:1-22

स्तोत्रसंहिता 25:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे. मला निराश होऊ देऊ नको, माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत. तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील. हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव. तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो. हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर. हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर. परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो. तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो. जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत. परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खूप आहेत. परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? प्रभू त्यास सूचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे. त्याचे जीवन चांगुलपणात जाईल, आणि त्याची संतान भूमीचे वतन पावतील. परमेश्वराचे सत्य त्याचे अनुकरण करणाऱ्यांबरोबर असते. आणि तो त्याचे करार कळवतो. मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो. कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो. परमेश्वरा माझ्याकडे फिर आणि माझ्यावर दया कर. कारण मी एकटा आणि पीडलेला आहे. माझ्या हृदयाचा त्रास वाढला आहे, संकटातून मला तू काढ. परमेश्वरा, माझे दु:ख आणि कष्ट बघ, माझ्या सर्व पापांची क्षमा कर. माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत. ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात. देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस. तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. देवा, इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या सर्व त्रासांपासून सोडव.

स्तोत्रसंहिता 25:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो. हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे; माझी फजिती होऊ देऊ नकोस; माझ्या वैर्‍यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस; तुझी कास धरणारा कोणीच फजीत होत नाही! निष्कारण कपट करणारे फजीत होतात. हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव; तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठव; ती पुरातन काळापासून आहेत. हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस; तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो. तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो. परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणार्‍यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत. हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. त्याचा जीव सुखासमाधानाने राहील; त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणार्‍यांबरोबर असते; तो आपला करार त्यांना कळवील. माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील. माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो; कारण मी निराश्रित व दीन आहे. माझ्या मनावरचे दडपण काढ; माझ्या संकटातून मला सोडव. माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पाहा; माझ्या सर्व पापांची क्षमा कर. माझे वैरी पाहा, ते फार झाले आहेत; ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करतात. माझ्या जिवाचे रक्षण कर; मला मुक्त कर; मी तुझा आश्रय धरला आहे म्हणून माझी फजिती होऊ देऊ नकोस. सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे. हे देवा, इस्राएलास त्याच्या सर्व संकटांतून सोडव.