स्तोत्रसंहिता 24:1-6
स्तोत्रसंहिता 24:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत. कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, आणि जलांवर त्याने ती स्थापली. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही. तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल. हिच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते.
स्तोत्रसंहिता 24:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत. कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला, आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले. याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील? ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही. त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल. त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल. हीच अशी पिढी आहे जी याहवेहचा शोध घेत आहे, याकोबाच्या परमेश्वरा, जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत. सेला
स्तोत्रसंहिता 24:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे; जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्रस्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत; हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. (सेला)