YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 18:16-29

स्तोत्रसंहिता 18:16-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तो उंचावरून खाली आला आणि त्याने मला पकडले! त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले. माझ्या शक्तीशाली शत्रूंपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले. कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते. माझ्या दु:खाच्या दिवशी ते माझ्याविरूद्ध आले; परंतु परमेश्वर मला उचलून धरणारा होता. त्याने मला विस्तृत खुल्या जागेमध्ये मोकळे केले! त्याने मला तारले कारण तो माझ्यामुळे संतुष्ट होता. माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने मला पुरस्कृत केले आहे, त्याने मला पुनसंचयित केले कारण माझे हात निर्मळ होते. कारण मी परमेश्वराच्या मार्गात राहिलो आणि दुष्टाईने देवापासून दूर फिरलो नाही. कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत. मी त्याच्यासमोर निर्दोष असा होतो, आणि मी स्वत:ला पापापासून दूर राखले. माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने पुनसंचयित केले. कारण त्याच्या डोळ्यासमोर माझे हात निर्मळ होते. जो विश्वासयोग्य आहे, त्याच्याशी तू विश्वास दाखवतोस, निर्दोष मनुष्याशी तू सात्विकतेने वागतोस. जे शुद्ध असतात त्यांच्याशी तू शुद्ध असतोस, परंतु जे कुटील त्यांच्याशी तू कुटीलतेने वागतोस. कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस. कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करितो. कारण तुझ्या मदतीने मी फौजेविरूद्ध जाऊ शकतो, माझ्या देवाच्या योगे मी तटावरुन उडी मारून जाऊ शकतो.

स्तोत्रसंहिता 18:16-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले. माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते. माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. त्याने मला प्रशस्त स्थली बाहेर आणले; तो माझ्याविषयी संतुष्ट होता म्हणून त्याने मला सोडवले. परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे मला फळ दिले; माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. मी त्याच्या दृष्टीने सात्त्विकतेने वागत असे आणि मी अनीतीपासून स्वतःला अलिप्त राखले. म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले. दयावंताशी तू दयेने वागतोस, सात्त्विकाशी सात्त्विकतेने वागतोस; शुद्धांशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस, दीन जनांना तू तारतोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकांना नीच करतोस; तू माझा दीप उजळतोस; परमेश्वर माझा देव, माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो. तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो.