YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 18:1-19

स्तोत्रसंहिता 18:1-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

“हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.” परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो मला सुरक्षा देतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो. तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे. जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वरास मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईन. मृत्यूच्या दोऱ्यांनी मला घेरीले, आणि नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले आहे. अधोलोकांच्या बंधनांनी मला घेरीले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले. मी संकटात असता, मी परमेश्वरास हाक मारली; मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली. त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली. तेव्हा पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. डोंगरांचे पाये थरथर कापले आणि हादरले, कारण देव क्रोधित झाला होता. त्याच्या नाकातून धूर वर चढला, आणि त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाला निघाल्या, ज्याने कोळसे पेटले गेले. त्याने आकाश उघडले आणि तो खाली आला, आणि निबिड अंधार त्याच्या पाया खाली होता. तो करुबावर स्वार झाला आणि वाऱ्याच्या पंखांनी वर उडत गेला. पावसाचे मोठे काळोख असे मेघ त्याने त्याच्याभोवती तंबू असे केले, त्याच्या समोरील तेजामुळे, गारा आणि जळते कोळसे बाहेर पडले. परमेश्वराने आकाशात गडगडाट केला! परात्पराने आवाज उंच केला, गारा आणि विजा बाहेर पडल्या. परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण उडाली, पुष्कळ विजांनी त्यांना छेदून टाकले. तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या सोसाट्याने हे परमेश्वरा, जगाचे पाये उघडे पडले. तो उंचावरून खाली आला आणि त्याने मला पकडले! त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले. माझ्या शक्तीशाली शत्रूंपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले. कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते. माझ्या दु:खाच्या दिवशी ते माझ्याविरूद्ध आले; परंतु परमेश्वर मला उचलून धरणारा होता. त्याने मला विस्तृत खुल्या जागेमध्ये मोकळे केले! त्याने मला तारले कारण तो माझ्यामुळे संतुष्ट होता.

स्तोत्रसंहिता 18:1-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले. अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता. त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून ग्रासणारा अग्नी निघत होता, त्यामुळे निखारे धगधगत होते. आकाश लववून तो खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता. तो करूबारूढ होऊन उडाला, त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले. त्याने आपणाला काळोखाने आच्छादून घेतले, त्याने आपणाला आकाशातील मेघमय अंधाराचा, दाट ढगांचा मंडप केला. त्याच्यापुढील तेजाने घनमेघांमधून गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली; त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली. तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने जलाशयाचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले. त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले. माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते. माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. त्याने मला प्रशस्त स्थली बाहेर आणले; तो माझ्याविषयी संतुष्ट होता म्हणून त्याने मला सोडवले.

स्तोत्रसंहिता 18:1-19

स्तोत्रसंहिता 18:1-19 MARVBSIस्तोत्रसंहिता 18:1-19 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा