स्तोत्रसंहिता 147:1-20
स्तोत्रसंहिता 147:1-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे. परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो. तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो. तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही. परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो. गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा. तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो. तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो. घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही. जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो. हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर. कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत. तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो. तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो. तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते. त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले. त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 147:1-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाणे किती मनोरम, किती यथार्थ आहे! यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे; इस्राएलाच्या निर्वासितांचे तिथे पुनर्वसन करत आहेत. भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात, आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात. ते तार्यांची गणती करतात आणि त्यांनी प्रत्येकास नाव दिलेले आहे. ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे; त्यांची बुद्धी अपरिमित आहे. याहवेह नम्रजनांस आधार देतात, परंतु दुर्जनास बहिष्कृत करतात. याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा; वीणेच्या साथीवर आमच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा. ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात; पावसाच्या सरी भूमीवर पाठवितात आणि डोंगरावर हिरवे गवत रुजवितात. ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात व हाक मारणार्या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात. घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही, मानवाचे सामर्थ्यवान पायही त्यांना संतुष्ट करीत नाही. याहवेह त्यांचे भय बाळगणार्यांवर संतुष्ट असतात, तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात. यरुशलेम, याहवेहचा महिमा कर; सीयोने, आपल्या परमेश्वराची स्तुती कर. कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत आणि त्या नगरातील तुझ्या लोकांस आशीर्वाद दिला आहे. ते तुझ्या सर्व सीमांत शांतता प्रस्थापित करतात; ते उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतात. ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात; त्यांचा शब्द वायुवेगाने पसरतो. शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात आणि हिमकण जमिनीवर राखेसारखे विखुरतात. ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्या थंडीपुढे कोण टिकेल? परंतु नंतर ते उष्ण हवेला आज्ञा करतात, तेव्हा हिम वितळते आणि जलप्रवाह वाहू लागतो. त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत आणि विधी व नियम इस्राएलला स्पष्ट केले आहेत. इतर कोणत्याही राष्ट्राकरिता त्यांनी असे केले नाही; ते त्यांच्या आज्ञांबाबत अज्ञानी आहेत.
स्तोत्रसंहिता 147:1-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेशाचे स्तवन करा,1 कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे, आणि स्तोत्रे गाणे शुभच आहे. परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवतो; इस्राएलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो. भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. तो तार्यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची-त्यांची नावे देतो. आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे; त्याची बुद्धी अमर्याद आहे. परमेश्वर लीनांना आधार देतो; तो दुर्जनांना धुळीस मिळवतो. तुम्ही परमेश्वराचे उपकारस्मरण करून त्याची कीर्ती वर्णा; वीणेवर आमच्या देवाची स्तोत्रे गा. तो मेघांनी आकाश आच्छादतो; तो भूमीसाठी पर्जन्य तयार करतो, डोंगरांवर गवत रुजवतो. तो पशूंना व कावळ्यांच्या कावकाव करणार्या पिलांना त्यांचे अन्न देतो. तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही. जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. हे यरुशलेमे, परमेश्वराचा गौरव कर; हे सीयोने, तू आपल्या देवाचे स्तवन कर. कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे. तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरतो; उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो; तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. तो लोकरीसारखे हिम पाडतो; राखेसारखे दवाचे कण पसरतो. तो आपल्या बर्फाचा चुर्याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल? तो आपला हुकूम पाठवून ते वितळवतो; तो आपला वारा वाहवतो तेव्हा पाणी वाहू लागते. तो याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय विदित करतो. कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही; त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेशाचे स्तवन करा!1