स्तोत्रसंहिता 143:7-12
स्तोत्रसंहिता 143:7-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे. माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस, किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन. सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो. मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो. हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर. तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ. तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर; आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे.
स्तोत्रसंहिता 143:7-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या; माझा आत्मा दुर्बल झाला आहे. तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, नाहीतर मी अधोलोकात जाणार्यासारखा होईन. प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे, म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा. याहवेह, मला माझ्या शत्रूच्या तावडीतून सोडवा, कारण मी तुमच्यामध्ये लपलो आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा, कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात; तुमचा उत्तम आत्मा मला नीतिमार्गाने नेवो. हे याहवेह, तुमच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून माझे जीवन सुरक्षित ठेवा; तुमच्या नीतिमत्वास अनुसरून या संकटातून मला बाहेर काढा. माझ्यावरील तुमच्या अक्षय प्रीतीमुळे माझ्या शत्रूंचा नाश करा; माझ्या सर्व विरोधकांचा नायनाट करा, कारण मी तुमचा सेवक आहे.
स्तोत्रसंहिता 143:7-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा गळून गेला आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नकोस; लपवशील तर मी गर्तेत उतरणार्यांसारखा होईन. प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे; कारण तुझ्यावर माझा भाव आहे; ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळव कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे. हे परमेश्वरा, माझ्या वैर्यांपासून मला मुक्त कर; मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव; कारण तू माझा देव आहेस; तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेवो. हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी मला नवजीवन दे; तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटांतून बाहेर काढ. तू आपल्या दयेने माझ्या वैर्यांचा नायनाट कर; माझ्या जिवाला गांजणार्या सर्वांचा नाश कर; कारण मी तुझा दास आहे.